सूर्योदय वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत मोठी अपडेट समोर येत असून अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येतो.
पात्रता खालीलप्रमाणे आवश्यक होती….
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२.राज्यातील विवाहीत,विधवा,घटस्फोटीत,परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३.किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
मात्र अनेक लाडक्या बहिणी पात्र नसताना देखील ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या,नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००
अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे