अवैध वाळू माफियांची दहशत;तहसीलदार आणि पथकावर जीवघेणा हल्ला

सूर्योदय वृत्तसेवा

अंबड (प्रतिनिधी):अंबड तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की,त्यांनी आता थेट शासकीय अधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर हल्ला करून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासनात खळबळ उडाली असून,अंबड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थरारक पाठलाग आणि जीवघेणा हल्ला

दिनांक १० सप्टेंबर रोजी,दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथक हस्तपोखरी परिसरात गस्त घालत होते.त्यावेळी त्यांना एक लाल रंगाचा विना-क्रमांक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळला.पथकाने ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे,सुरजीत दिगंबर खंडेकर (रा.काजळा, ता. बदनापूर),वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता,त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.

त्यानंतर,पुढील कार्यवाहीसाठी पथकातील तलाठी विवेक गोसावी यांना ट्रॅक्टरजवळ थांबवून तहसीलदार पुढे निघणार असतानाच,आरोपी चालकाने अत्यंत धोकादायक कृत्य केले.त्याने तलाठी गोसावी यांना ट्रॅक्टरवरून खाली ढकलून दिले,ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर ओतली आणि ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय चव्हाण आणि ग्राममहसूल अधिकारी किशोर गायकवाड यांनी आपल्या मोटरसायकलवरून ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला.पारनेर तांडा ते धनगरपिंपळगाव शिवारापर्यंत सुमारे ३० ते ४० किलोमीटर हा थरारक पाठलाग चालला.या पाठलागादरम्यान, आरोपीने अनेक वेळा मोटरसायकलवर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा निर्दयी प्रयत्न केला.

ट्रॅक्टर सोडून आरोपी फरार

अखेरीस,धनगर पिंपळगाव-कर्जत शिवरस्त्यावर आरोपीच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली.त्यानंतर तो ट्रॅक्टर तिथेच सोडून शेत रस्त्याने पळून गेला.तहसीलदार चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो अंबड तहसील कार्यालयात जमा केला.

गंभीर गुन्हा दाखल

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, अंबड पोलीस ठाण्यात आरोपी सुरजीत दिगंबर खंडेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, आणि खाण अधिनियम १९५२ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणे, चोरी, शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि जिवे मारण्याचा प्रयत्न यांसारख्या कलमांचा समावेश आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेने वाळू माफियांच्या वाढलेल्या दहशतीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला असून,या पुढेही अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!