सुखापुरी-लखमापुरी रस्त्यावर जीवघेणा प्रवास;संगमेश्वर नदीवरील अपूर्ण पुलामुळे नागरिकांची कुचंबणा

सूर्योदय वृत्तसेवा

सुखापुरी: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुखापुरी-लखमापुरी मार्गावरील संगमेश्वर नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेतच थांबले आहे. त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे पावसाळापूर्व कामांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार,या पुलाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पण निधीची कमतरता,ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. आता पावसाळा सुरू झाल्यावर, या अर्धवट पुलामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

जीव मुठीत घेऊन प्रवास

पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचले असल्यामुळे,दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.अनेकवेळा या ठिकाणी लहान-मोठे अपघात झाले आहेत. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे लहान मुले आणि वृद्धांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.हा पूल सुखापुरी आणि लखमापुरी या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.शेतीची कामे,बाजारपेठ आणि शाळा-महाविद्यालयांसाठी याच मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या समस्येचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून, अपूर्ण पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा, येणाऱ्या काळात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!