सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार झाला त्यावरुन पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316 (4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात ₹24,90,77,811/- इतक्या रकमेचा अपहार झालेला आहे. सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे.सदर गुन्हयात यापुर्वी आरोपी सुशिलकुमार दिनकर जाधव (सहाय्यक महसुल अधिकारी) यास अटक करण्यात आलेली असुन तो सद्या जिल्हा कारागृहात आहे.
त्यानंतर अटक केलेला आरोपी शिवाजी श्रीधर ढालके,रा. उमरी बाजार,ता.दर्यापुर, जि.अमरावती तलाठी,तहसील कार्यालय अंबड, यास दिनांक १९ सप्टेंबर रोजी अटक केलेली असुन तो सद्या पी.सी.आर. मध्ये आहे.त्याचेकडे गुन्हया संदर्भाने केलेल्या चौकशी दरम्यान तलाठी शिवाजी ढालके यांनी त्यांचे मुळ गाव उमरी बाजार ता दर्यापुर जि. अमरावती येथील ५० पेक्षा अधिक लोकांची नावे त्यांचे सजेतील दाढेगाव ता. अंबड येथे टाकुन त्यांचे नावे आर्थिक लाभ घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे.
तसेच चौकशी दरम्यान आरोपींना सहाय्य करणारे कोतवाल, एजंट यांचा सक्रीय सहभाग दिसुन आल्याने 1) कोतवाल मनोज शेषराव उघडे रा.दाढेगाव ता. अंबड २) खाजगी सहाय्यक साहेबराव उत्तमराव तुपे रा.पिठोरी सिरसगाव ता.अंबड,यांना आर्थिक गुन्हे शाखा जालना यांनी काल रात्री अटक करुन आज रोजी आरोपीतांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कष्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदर प्रकरणात तलाठ्यांचे काम सोपे होण्या करीता व जास्तीत जास्त बोगस नावे अनुदान यादीमध्ये टाकण्यासाठी तलाठ्यांनी काही एजंट / सहाय्यकांचा वापर केला त्या बदल्यात एजंट/सहाय्यकांनाही टक्केवारी प्रमाणे आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आरोपी व आरोपींना सहाय्य करणारे एजंट यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न करुन त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच उर्वरीत आरोपींचे शोधार्थ पथके रवाना आहेत.