वॉर्ड,गण आणि प्रभागाचे ‘डिजिटल वॉरियर्स’ झाले ‘विकास दूत’;मतदारांमध्ये संभ्रम कायम
सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका/नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजल्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सोशल मीडियावर केवळ ‘नेत्याचा कट्टर समर्थक’,’भाऊंचा आदेश अंतिम’ असे रुबाबदार स्टेटस ठेवणारे तरुण कार्यकर्ते, आता अचानक ‘विकासाचे दूत’ बनून मतदारांच्या दारात उभे राहू लागले आहेत.त्यांच्या फेसबुक,इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप स्टेटसवरील भाषेत कमालीचा बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.पूर्वी ‘विरोधकांना जागेवरच ठेचले जाईल’ अशा आशयाचे स्टेटस ठेवणारे हे कार्यकर्ते आता ‘आपला विकास, आपले भविष्य! यंदाचा अजेंडा – पाणी, रस्ते आणि आरोग्य!’ अशा विकासाच्या बाता करत आहेत.
केवळ शहरापुरतेच नाही,तर जिल्हा परिषद गणांमध्ये आणि पंचायत समिती स्तरावरही हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अचानक शेतकरी हित,शिक्षण आणि जलसंधारण यासारख्या विषयांवर गंभीर चर्चा करताना दिसत आहेत.वॉर्ड,गण आणि प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी,रस्ते,गटारी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर साधा ‘मीम’ किंवा टीकात्मक पोस्ट न टाकणारे हे ‘डिजिटल वॉरियर्स’,आता शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मोठी स्वप्ने विकू लागले आहेत. एका रात्रीत झालेला हा वैचारिक बदल मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेमके कोणते आणि किती काम केले जाईल,यावर भर देण्याऐवजी,सध्या केवळ भावनिक साद घालण्यावर भर दिला जात आहे.
परंतु यावेळचे मतदार अधिक जागरूक असल्याचे दिसत आहेत.नुसत्या भावनिक ‘बाता’ किंवा आकर्षक ‘पोस्टरबाजी’पेक्षा प्रत्यक्ष कामाचा आणि ठोस धोरणांचा आग्रह ते धरू लागले आहेत.केवळ निवडणुकी पुरते विकासाचे गाणे गाणाऱ्यांना मतदार आता सोशल मीडिया पेक्षा प्रत्यक्ष मतपेटीतून उत्तर देणार,असे चित्र दिसत आहे.जालना जिल्ह्याच्या राजकारणातील ही ‘स्टेटस’ ते ‘विकास’ यात्रा किती यशस्वी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मतदारांनी फक्त ‘स्टेटस’ न पाहता,मागील पाच वर्षांतील कामाचा ‘वर्क रिपोर्ट’ तपासावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुढील भाग लवकरच……..