‘आय-सरिता’मधील एरर ठरला निर्णायक;अंबडच्या सहाय्यक दुय्यम निबंधकांनी स्वतः ‘ॲक्शन’ घेत जमिनीच्या घोटाळ्यातील ८ आरोपींना पाठलाग करून केले जेरबंद…!

अंबड येथील सहदुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेची कहाणी

सूर्योदय वृत्तसेवा

अंबड येथील सहा दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रांक कार्यालयात बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रे सादर करून जमिनीची खरेदी-विक्री करण्याचा एक मोठा कट उघडकीस आला. सहदुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांनी केवळ सतर्कताच दाखवली नाही,तर स्वतः धाडस करून आरोपींचा पाठलाग करत त्यांना पकडले. प्रवीण राठोड यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि त्वरित कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ५ मुख्य आरोपींसह एकूण ८ आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.हा सर्व प्रकार दिनांक ०४/११/२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडला.

सविस्तर माहिती अशी की अंबड येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी प्रवीण राठोड हे नियमित कामकाज करत असताना ८ ते १० इसमांनी त्यांना मौजे देवळेगव्हाण, ता.जाफ्राबाद, जि.जालना येथील गट क्र. ५५३ मधील ०.४० आर.जमिनीच्या खरेदीखताची कागदपत्रे सादर केली. या खरेदीखतात लिहुन देणारे म्हणून नाशिक आणि मुंबई येथील पाच व्यक्तींची नावे होती,तर लिहुन घेणारे म्हणून समाधान कडुबा वनारसे (रा.फत्तेपूर,ता. भोकरदन) यांचे नाव होते.काही तांत्रिक अडचणी आणि साक्षीदारांच्या ओळखीनंतर खरेदीखताची नोंदणी करण्यात आली.

निबंधक यांच्या सतर्कतेमुळे फसवणूक उघड:

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,एका व्यक्तीने सहदुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांच्याकडे येऊन संशय व्यक्त केला की,हे इसम यापूर्वीही इतर नोंदणी कार्यालयात अशाच रजिस्ट्रीसाठी फिरताना दिसले आहेत आणि त्यांच्याकडे कुलमुखत्यारपत्र देखील होते.या माहितीमुळे संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ ‘आय-सरिता’ सिस्टीममध्ये तपासणी केली.छत्रपती संभाजीनगर येथील मागील कुलमुखत्यारपत्रावरील सह्या आणि आजच्या खरेदीखतावरील सह्या व फोटो यामध्ये मोठी तफावत आढळली.यामुळे सदर लोकांनी बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रे वापरून फसवणूक केल्याची खात्री झाली.

अधिकारी बनले ‘ॲक्शन हिरो’:

फसवणूक झाल्याची खात्री होताच, सहदुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि स्वतः या फसवणूक करणाऱ्या इसमांचा पाठलाग सुरू केला.त्यांनी आरोपींचा पाठलाग करत अंबड-जालना रोडवरील पारनेर फाट्याजवळील गौरी हॉटेलजवळ त्यांना गाठले. त्याच वेळी, पोलीस निरीक्षक साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सहदुय्यम निबंधकांनी पकडलेल्या ८ आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.चौकशीत,या आरोपींनी खरेदीखतावर खोटी नावे वापरल्याची कबुली दिली. बनावट नावे धारण करणारे ५ मुख्य आरोपींसह, त्यांना मदत करणारा १ इसम आणि २ साक्षीदार अशा एकूण ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लिहुन घेणारा ‘समाधान कडुबा वनारसे’ मात्र घटनास्थळावरून पळून गेल्याचे समजले.

सहा दुय्यम निबंधक कार्यालयाने या सर्व आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी,भारतीय नोंदणी अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित कलमांखाली कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धाडसामुळे शासकीय कार्यालयात होणारा एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!