सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना: मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याने हा घातपाताचा कट रचल्याचा आरोप आहे.यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जरांगे पाटील यांचा घातपात घडवून आणण्याचा कट रचला होता.या कटासाठी काही व्यक्तींशी संपर्क साधला.या व्यक्तींनी जरांगे पाटील यांच्या एका जुन्या सहकाऱ्याला हाताशी धरून त्याला अडीच कोटी रुपयांची मोठी ऑफर दिली होती.हत्येचा कट कसा अमलात आणायचा,यासाठी बीड शहरात बैठका देखील झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.या निवेदनामुळे तात्काळ यंत्रणा हलली असून,पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.पोलिसांनी चौकशीसाठी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोन आरोपींनी हत्येच्या कटात सहभाग घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच,स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली आहे.जालना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. हत्येचा कट नेमका कसा रचला गेला याचे काही व्हिडिओ आणि महत्त्वाचे पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात नेमके काय निष्पन्न होते, हत्येचा कट रचणारा तो ‘बडा नेता’ कोण आहे,आणि या कटामागील नेमका उद्देश काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.