सूर्योदय वृत्तसेवा
जालना: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (७ नोव्हेंबर २०२५) मराठा आंदोलनाच्या अंतरवाली सराटी गावात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक दावा करताना, या कटामागे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचा थेट हात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, या कटात १० ते ११ जण सहभागी आहेत आणि या सगळ्या कटाचा मूळ सूत्रधार धनंजय मुंडे हेच आहेत.
जरांगे यांनी कटाचा घटनाक्रम स्पष्ट करताना सांगितले की, सुरुवातीला त्यांचे खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश न आल्याने खूनच करून टाकण्याचा किंवा गोळ्या देऊन/औषध देऊन घातपात करण्याचा दुसरा कट रचला गेला. त्यांनी असा दावा केला की, मुंडे यांच्या पीएने पकडलेल्या आरोपींपैकी एकाला परळीला नेले होते, जिथे मुंडे यांनी महत्त्वाची बैठक सोडून आरोपीची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत वीस मिनिटे चर्चा केली. मुंडे यांनी आरोपींना बाहेरच्या पासिंगची जुनी गाडी देण्याची तयारी दर्शवली आणि हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरली होती. भाऊबीजेच्या दिवशीही कट रचण्यात आला होता, परंतु तो उघडकीस आल्याने टळला.
जरांगे पाटील यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. लोक मारून आणि डावं करून समोरच्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत.”
या सर्व प्रकरणावर जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालून या कटाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.तसेच, मराठा समाजातील सर्व बांधवांना शांतता पाळण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. “मी जिवंत असेपर्यंत कोणीही टेन्शन घेऊ नका, मी मेल्यावर काही करायचं ते करा. मी असेपर्यंत शांत राहायचंय,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. जरांगे यांनी या कटात पंकजा मुंडे यांचेही नाव घेत त्यांच्याबद्दलची घाणेरडी माहिती आरोपींकडे असल्याचे गंभीर वक्तव्य केले.