सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर;शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी कामे करतांनी सावधानता बाळगावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

सूर्योदय वृत्तसेवा

जालना जिल्ह्यात सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी केल्यानंतर लक्षात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी शेतातील कामे करतांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात मंगळवार दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे पिठोरी सिरसगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट वन्य प्राणी दिसला असल्याच्या माहितीवरुन वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान बिबटचा या परिसरात वावर असल्याचे दिसून आले. हा वन्य प्राणी या भागात साधारण 10 किलोमिटरच्या परिघात वावरत असून सदर क्षेत्रात प्रामुख्याने ऊसाचे पीक दिसून आले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालु असल्याने बिबट प्राणी शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सुखापुरी मंडळात सुखापुरी, वडीकाळ्या, एकनाथ नगर, वडीगोद्री, पिठोरी सिरसगाव, कारंजळा या गावांचा समावेश आहे. तरी या गावातील ग्रामस्थ, शेतकरी व ऊसतोड करणाऱ्या मजुरांमध्ये वन्यजीव बचाव टीमकडून वन्य प्राणी बिबटबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समुहाने कामे करावीत.एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. बिबट आढळुन आल्याने ऊसतोडणी सुरु असताना शेतकऱ्यांनी व मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गावाजवळ, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळविण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात बिबट किंवा त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड (मो.8262078886), वनपरिमंडळ अधिकारी बी.एम.पाटील (मो.9730414287) आणि वनरक्षक कैलास कदम (मो.9730131498) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. असेही आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!