सुर्योदय वृत्तसेवा|अंबड
अंबड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी या निर्णया मागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.अंबड नगर पालिके साठी नगराध्यक्ष पदासह एकूण २२ उमेदवार भाजपने आज दाखल केले आहेत.
कुचे यांनी स्पष्ट केले की,या निवडणुकीत मित्र पक्षांसोबत युती न करण्यामागे इच्छुकांनी केलेली गर्दी हे मुख्य कारण आहे.अंबडमध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल ११७ कार्यकर्ते इच्छुक होते. सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी,या उद्देशाने पक्षाने मित्र पक्षांसोबत युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा मार्ग निवडला आहे.
यावेळी आमदार कुचे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.अंबड शहरातील जनता आणि मतदार भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीने निवडून देतील.भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार किमान ७० टक्के मतदान मिळवून पूर्णपणे विजयी होईल,असा दावा त्यांनी केला. तसेच,अलीकडेच झालेल्या भाजपच्या रॅलीमध्ये ६,००० हून अधिक लोकांची उपस्थिती होती,हेच पक्षाच्या ताकदीचे मोठे प्रदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या निष्कलंक आणि स्वच्छ प्रतिमेमुळे लोकांच्या हृदयात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अंबड नगरपरिषद १०० टक्के निवडून येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.