सुर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या सुखापुरी मंडळ आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे शेतकरी आणि ऊसतोड कामगारांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.एकीकडे ऊसतोडीचा हंगाम जोरात सुरू असताना, दुसरीकडे वन विभागाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सुखापुरी,वडीकाळ्या, एकनाथ नगर,वडीगोद्री,पिठोरी सिरसगाव, कारंजळा या परिसरांमध्ये बिबट्या वारंवार शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना दिसून येत आहे. ऊसाच्या शेतीत लपून बसलेला हा बिबट्या कधी हल्ला करेल, या भीतीने शेतातील कामे करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या भीतीच्या वातावरणातून अनेक ठिकाणी ऊसतोडणीच्या कामावर परिणाम झाला असून,मजूर गट करूनही शेतात जाण्यास कचरत आहेत.
या गंभीर समस्येवर स्थानिक नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर आहे. बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाने पाहणीनंतर मान्य केले असले तरी,त्याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस मोहीम अजूनपर्यंत हाती घेण्यात आलेली नाही. “बिबट्या वारंवार दिसत असतानाही वन विभागाचे कर्मचारी केवळ पाहणी करून आणि लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन मोकळे होत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी आम्ही अनेकदा केली, पण वन विभाग झोपेत आहे का?”असा संतप्त सवाल येथील शेतकरी विचारत आहेत.केवळ जनजागृती करून किंवा लोकांना सावध राहण्याचे आवाहन करून या समस्येचे निराकरण होणार नाही, तर बिबट्याला लवकरात लवकर पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणे आवश्यक आहे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या परिस्थितीत,सुखापुरी परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग तातडीने कोणती निर्णायक पाऊले उचलणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.