अतिवृष्टी अनुदान घोटाळा विशेष भाग ३
जालना येथील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आता अधिक गती दिली आहे. या संदर्भात, जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी माहिती दिली असून,आतापर्यंत सुमारे ४,००० ते ५,००० खातेधारकांच्या बँक खात्यांची कसून तपासणी करण्यात आली आहे.
या घोटाळ्याच्या चौकशीत पोलिसांनी महत्त्वपूर्ण प्रगती केली असून,आतापर्यंत जवळपास २०० ते २५० लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड (नोंद) केले आहेत, ज्यामुळे तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली आहे. सध्या या प्रकरणात ताब्यात असलेल्या एकूण सात आरोपींच्या बँक खात्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे आणि त्यांची कसून तपासणी केली जात आहे.
तपासणी दरम्यान पोलिसांना अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.घोटाळ्यातील अनुदानाचे काही पेमेंट जालन्या बाहेरील इतर जिल्ह्यांमध्ये ट्रान्सफर (हस्तांतरित) झाल्याचे उघड झाले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार,या पेमेंट हस्तांतरणामागे एजंट्सचा सक्रिय सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे,आता आर्थिक गुन्हे शाखेने आपला तपास एजंट्सच्या नेटवर्कवर अधिक केंद्रित केला असून, लवकरच या संदर्भात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या व्यापक तपासामुळे घोटाळ्यातील सहभागी आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पुढील भाग लवकरच