अतिवृष्टी अनुदान घोटाळा विशेष भाग ४
जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.प्रशासनातील तलाठ्यांनीच हा मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून,या घोटाळ्याचा पर्दाफाश एका तलाठ्याच्या दोन पत्नींमधील वादामुळे झाला.या महाघोटाळ्यात सुमारे २६ हून अधिक तलाठी आणि ग्रामसेवक गुंतलेले असल्याचे समोर आले आहे.
हा घोटाळा जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड भागामध्ये २०२४ मार्च-एप्रिल महिन्याच्या आसपास उघडकीस आला होता.संबंधित तलाठ्याने अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम आपल्या एका आवडत्या पत्नीच्या खात्यावर ५० लाख रुपये आणि तुलनेने नावडत्या असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या खात्यावर केवळ १० लाख रुपये वळती केली.अनुदानाच्या रकमेतील या भेदभावामुळे नावडत्या पत्नीला राग आला आणि तिने थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे प्रशासनाने चौकशी सुरू केली असता,एका साध्या धाग्यामुळे १०० कोटींहून अधिकच्या घोटाळ्याचे मोठे स्वरूप उघड झाले.या चौकशीमध्ये तब्बल २६ तलाठ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांसाठी आलेले १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे अनुदान हडपल्याचे स्पष्ट झाले आहे.घोटाळा करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी जवळपास एक हजार सोयरे-नातेवाईक उभे केले आणि त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वळती केली.विशेष म्हणजे,शासकीय यंत्रणेतील त्रुटीचा गैरफायदा घेत या भामट्या कर्मचाऱ्यांनी थेट तहसीलदारांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि त्यांच्या सह्याचे क्रिडेंशियल वापरून अनुदानाची रक्कम वळवून घेतल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणाची चौकशी प्रक्रिया जवळपास अडीच महिन्यांपासून सुरू असून,२६ ते २७ हून अधिक तलाठी आणि ग्रामसेवक यामध्ये गुंतले असल्याची माहिती आहे. प्रशासनात अशाप्रकारे वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
पुढील भाग लवकरच…