सूर्योदय वृत्तसेवा|जालना
आमदार नारायण कुचे यांनी आपल्याला ओळखत नाही, तसेच आपल्याशी फोनवर बोललो नाही, हे केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा थेट दावा डॉ. स्नेहल रवींद्र घुगे यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. त्यांनी आमदार कुचे आणि त्यांच्या पीएंशी झालेले संपर्क तसेच त्यांच्या नणंद/नणंदेच्या पतीसोबतचे आमदारांचे संबंध दाखवणारे फोटो, व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे व्हिडिओमध्ये सादर केले आहेत. या प्रकरणात राजकारण न आणता, वस्तुस्थितीची चौकशी करून आपल्याला न्याय देण्याची विनंती डॉ. घुगे यांनी आमदारांना केली आहे.
डॉ. स्नेहल घुगे यांनी आमदार कुचे यांच्या ‘मी त्या महिलेला ओळखत नाही’ या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आमदार कुचे यांना आपण ओळखत नाही, असे म्हणता येणार नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक पुरावे सादर केले आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार,आपल्याला झालेल्या मारहाणीचे फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहिती त्यांनी आमदार कुचे यांच्या दोन्ही पीएना तसेच आमदारांच्या वैयक्तिक क्रमांकावर वेळोवेळी पाठवली होती. इतकेच नव्हे तर, आमदार कुचे यांची ओळख सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नणंद सरपंच योगिता संजय सानप यांचे पती संजय सानप हे आमदार कुचे यांचा सत्कार करतानाचे फोटोही दाखवले.
डॉ.घुगे यांच्या म्हणण्यानुसार,आमदार कुचे यांच्यासोबत त्यांचे दोन ते तीन वेळा बोलणे झाले आहे,ज्याचे रेकॉर्डिंग पुरावे म्हणून त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आमदार कुचे यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची एक क्लिपही त्यांनी ऐकवली, ज्यात त्या स्वतः पुण्यावरून बोलत असल्याचे सांगून मदतीची विनंती करत आहेत. या संभाषणात, आमदार कुचे यांनी त्यांना अंबड पोलीस स्टेशनला जाण्यास सांगून ‘मी पोलीस बंदोबस्त देतो तुम्हाला’ असे आश्वासन दिले होते, ज्यामुळे आमदार त्यांना ओळखत नसल्याचा दावा खोटा ठरतो,असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार कुचे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून डॉ.घुगे अंबड पोलीस स्टेशनला गेल्या होत्या.तिथे त्यांनी कुचे साहेबांना फोन लावला असता,पीआय साहेबांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू असल्याचे पाहताच फोन लगेच ठेवून दिला आणि १५ ते २० मिनिटांसाठी दूर जाऊन आमदारांशी त्यांच्या मोबाईलवरून बोलणे केले. यानंतर पीआय साहेबांनी कार्यालयात बोलावून ‘मी तक्रार करायला रेडी नाहीये’ आणि ‘जर माझ्या जीवाचे काही झाले तर त्याची जिम्मेदार पूर्णपणे मीच असेल’ अशा आशयाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली,असा गंभीर आरोप डॉ.घुगे यांनी केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ बनवण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले.
आमदार कुचे यांनी ‘नवरा पळून गेला तर मिसिंग कंप्लेंट का नाही केली’ असे वक्तव्य केल्याचा उल्लेख डॉ. घुगे यांनी केला.याला उत्तर देताना, त्यांनी वाघोली पोलीस स्टेशनला २६ डिसेंबर २०२४ रोजी मिसिंग कंप्लेंट दाखल केल्याची माहिती दिली आणि त्याची पीडीएफ कॉपीही आमदारांच्या पीएला पाठवल्याचे सांगितले.
“माझा आणि तुमचा काहीही असा विरोधी पक्ष नेत्यासारखा काहीही प्रकार नाहीये,ह्याला राजकारणाच वळण देऊ नका,” अशी विनंती डॉ. घुगे यांनी आमदार कुचे यांना केली आहे. त्यांनी आमदार कुचे यांना त्यांचे आणि त्यांच्या नणंद-नंदोईचे संबंध तपासावेत,तसेच त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींना समोर आणावे अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी, संजय शिवाजी सानप, रवींद्र महादेव घुगे यांच्यासह सर्व संबंधित लोकांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत,असे त्यांनी सुचवले. कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करता, आमदार कुचे यांनी या प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, हीच आपली एकमेव अपेक्षा असल्याचे डॉ. स्नेहल घुगे यांनी ठामपणे नमूद केले आहे.
डॉ.घुगे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची लिंक👇
https://youtu.be/SyaEceEN-74?si=eUUSLcpx40E-C2L-