सूर्योदय वृत्तसेवा|अंबड
पुणे शहरातून केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मूळ गावी अंबड येथील मतदान केंद्रावर आलेल्या आनंद बळीराम शिंदे नावाच्या एका तरुण मतदाराने आपल्या नावाने आधीच बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.आज सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे मतदान पूर्वीच झाले आहे, ज्यामुळे शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी सकाळपासून माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यातून आलो आहे. हे माझे मतदार कार्ड आहे, पण मी इथे येण्यापूर्वीच कोणीतरी माझे बोगस मतदान केले आहे.” त्यांनी स्वतःचा हात दाखवत स्पष्ट केले की त्यांच्या हातावर कुठेही शाई लागलेली नाही, तरीही अधिकारी त्यांचे मतदान झाल्याचे सांगत आहेत.याबाबत विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबायला सांगितले आणि कोणीतरी वरिष्ठ येणार असल्याचे सांगितले,पण शिंदे यांना थांबणे शक्य नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. “तुम्ही तिथे काय व्हेरिफाय करताय? मी अजून मतदान केले नसताना ते झाले कसे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. आपले पहिलेच मतदान असताना असा प्रकार घडल्याने आपण पुढे मतदान करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.