अतिवृष्टी अनुदान घोटाळा विशेष भाग ७
जालन्यामध्ये महसूल विभागात उघडकीस आलेल्या २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या महाघोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. २०२२ ते २०२४ या काळात अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळी अनुदानाच्या वाटपात झालेला हा अपहार केवळ काही महसूल कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, यातील मुख्य सूत्रधार म्हणून निलंबित तलाठी गणेश रुषिंदर मिसाळ (तत्कालीन सज्जा सुखापुरी, ता.अंबड) याचे नाव अग्रक्रमाने समोर आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी एकूण २२ तलाठ्यांसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात मिसाळ याचाही समावेश आहे. मात्र, हा घोटाळा घडवून आणणारा मिसाळ स्वतः त्याच्या ‘एजंट्स’सह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
मिसाळच्या सुखापुरी सज्जातील एजंट्सची भूमिका:
तलाठी गणेश मिसाळ याच्यावर बोगस लाभार्थींच्या याद्या तयार करणे, संगणक प्रणालीत फेरफार करणे, बनावट ‘व्हिके’ (VK) क्रमांक वापरणे आणि शासकीय अनुदान रकमेचा मोठा वाटा बोगस खात्यात वळवण्याचा मुख्य आरोप आहे.मिसाळ याने एकट्याने हा अपहार केला नसून,त्याने स्थानिक स्तरावर काही खासगी व्यक्तींना ‘एजंट’ म्हणून नेमले होते.या एजंट्सनी बोगस सातबारे तयार करणे,दुबार नावे समाविष्ट करणे,जिरायत जमीन बागायत दर्शवणे आणि अनुदानाचे पैसे काढण्यासाठी बनावट बँक खाती उघडणे,अशा विविध गैरकृत्यांमध्ये मिसाळला सक्रिय मदत केली.विशेषतःसुखापुरी सज्जातील या एजंट्समुळेच घोटाळ्याची रक्कम इतकी मोठी झाली.
मुख्य सूत्रधार आणि एजंट्स अटकेच्या प्रतीक्षेत:
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, पण घोटाळ्यातील मुख्य आरोपी, तलाठी गणेश मिसाळ आणि त्याचे गुन्हेगार साथीदार असलेले एजंट्स हे सर्वजण फरार आहेत. मिसाळ आणि त्याचे एजंट्स यांची धरपकड करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा (EOw) सातत्याने शोध घेत आहे. या प्रकरणात सुमारे २१ आरोपी अजूनही पोलिसांना गवसलेले नाहीत. मिसाळच्या अटकेमुळेच या एजंट्सची संपूर्ण साखळी,त्यांनी वापरलेली बनावट खाती आणि अपहार केलेल्या निधीचे जाळे पूर्णपणे उघडकीस येईल.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानात एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय दबाव वाढला आहे. फरार असलेले सूत्रधार मिसाळ आणि त्याचे सुखापुरी सज्जातील एजंट्स यांना लवकरात लवकर अटक केल्याशिवाय घोटाळ्याचा अंतिम तपास पूर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे, हे एजंट्स आणि मुख्य आरोपी कधी जेरबंद होतात,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पुढील भाग लवकरच….