जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयात महाघोटाळा;कार्यालयात परीक्षा न देताच मिळत होते लर्निंग लायसन

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

 

जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) शासकीय संगणक प्रणालीत अवैध प्रवेश करून शिकाऊ अनुज्ञप्ती (Learning License) चा महाघोटाळा करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे आता RTO कार्यालयाच्या ‘आत’पर्यंत पोहोचल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. बाहेरच्या खाजगी एजंट्सनी परिवहन विभागाची अत्यंत सुरक्षित प्रणाली भेदून परीक्षा बायपास करणे, तसेच RC/MDL सारखी गोपनीय माहिती ओटीपीशिवाय डाऊनलोड करणे हे कार्यालयातील गुप्त माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीशिवाय शक्य नसल्याचा अंदाज सायबर पोलीस तपासत आहेत.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत कडुबा बावस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘https://www.allcscservices.shop/’ या बनावट वेबसाइटद्वारे हा गुन्हा करण्यात आला आहे. एजंट्सनी या बनावट वेबसाइटचा उपयोग करून सारथी (SARATHI) पोर्टलवरील Faceless Learning Licence परीक्षा बायपास करून अनाधिकृतपणे शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केली. केवळ परीक्षा बायपास करणे नव्हे,तर कोणत्याही वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (MDL) हे ओटीपी पडताळणीशिवाय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून देणे हा शासकीय गोपनीयतेचा थेट भंग आहे.

हा अवैध प्रवेश करण्यासाठी लागणारे तांत्रिक कोड,लूपहोल्स किंवा सिस्टीमच्या संरचनेची माहिती कार्यालयातील एका विशिष्ट कर्मचाऱ्याशिवाय एजंट्सला मिळणे कठीण आहे, ज्यामुळे तपास आता RTO च्या ‘आतील’ गद्दाराच्या दिशेने वळला आहे.पेमेंट करतेवेळी अनाधिकृत असलेल्या वेबसाइट वॉलेटमध्ये UPI ID paytm.s1mvv86@pty आणि त्याचे नाव फैसल बशीर मीर आढळले आहे.पोलीस आता फैसल मीर याच्या माध्यमातून लायसन्स मिळवू इच्छिणारे एजंट्स आणि त्यांना सिस्टीमची माहिती पुरवणारा RTO मधील ‘गुप्त कर्मचारी’ या साखळीचा कसून तपास करत आहेत. या गुन्ह्यामुळे शासकीय प्रणालीचे गंभीर नुकसान झाले असून, शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या गंभीर गुन्ह्यासाठी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) आणि मोटर वाहन अधिनियम (Motor Vehicle Act) अंतर्गत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी अनेक एजंट्सना ताब्यात घेतले असले तरी,या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे, आणि त्याला RTO च्या ‘आतील’ कर्मचाऱ्याने कधी आणि कशी मदत केली, यावर पुढील तपासाची दिशा अवलंबून आहे. शासकीय महसुलाचे नुकसान करणारा आणि सार्वजनिक सुरक्षिततेशी खेळणारा हा घोटाळा RTO कार्यालयाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

 

पुढील भाग लवकरच……

 

Leave a Comment

error: Content is protected !!