समस्यांविरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाच्या तलवारीची धार बना-जी.श्रीकांत 

जालन्यातील परिषदेत स्वच्छता,सांडपाणी प्रक्रिया व कचरा व्यवस्थापनावर विचारमंथन

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

जालना शहराच्या शाश्वत, स्वच्छ आणि नियोजित विकासासाठी बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी येथील सिद्धार्थ द फर्न हॉटेलमध्ये पार पडलेल्या व्हेअर आयडियाज बिकम ॲक्शन’ या विषयावरील मंथन परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील जलसंधारण, पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया व कचरा व्यवस्थापनावर तब्बल चार तास मार्गदर्शन करून महत्त्वाच्या समस्यांच्या अनुषंगाने ठोस उपाययोजनांवर विचार मंथन केले. या निमित्ताने शहराच्या भविष्याच्या दृष्टीने बिजारोपण केले गेले असून, जालना फर्स्ट, जिल्हा प्रशासन आणि जनतेच्या सक्रिय सहभागातून निश्चितच शहर विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.जिल्हा प्रशासन, जालना शहर महानगरपालिका आणि जालना फर्स्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘व्हिजन जालना 2030’ या संकल्पनेवर आधारित या मंथन परिषदेत प्रारंभी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. पहिले सत्र सोर्स सेग्रिगेशन, कलेक्शन व सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आणि दुसरे सत्र अर्बन ड्रेनेज, एसटीपी व लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर तर दुसरे सत्र अर्बन ड्रेनेज, एसटीपी व लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर झाले.

समस्याविरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाच्या तलवारीची धार बना- श्रीकांत

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासकीय अधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, ज्या घरची कुटुंबप्रमुख महिला असते, त्या कुटुंबाचा विकास होतो. आज कुटुंबप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दोघीही महिला लाभल्या आहेत. समस्यांविरुद्ध त्या लढत असून, तुम्हा सर्वांना त्यांच्या तलवारीची धार बनावी लागेल. जोपर्यंत संपर्क, संवाद आणि समाधान एकत्र येणार नाही तोपर्यंत विकास अशक्य आहे. अधिकारी आज आहेत उद्या जातील. काम तुम्हा सर्वांनाच करावी लागणार आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते. ठीक आहे. बदली होऊ शकते मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता कोणीही बदलू शकत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर आणि नदी स्वच्छतेबाबत अवलंबविलेल्या विविध उपायांची त्यांनी माहिती देत जालना महापालिकेनेही शिवा निवृत्त स्वच्छता निरीक्षक, सेवाभावी संस्था आणि समर्पित व्यक्तिमत्त्वांची मदत घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

 

पुढच्या पिढीसाठी आपण कचरा सोडून जाणार का?- सौ. श्रुती लुटे

कार्पल्स कन्सल्टिंगच्या मॅनेजिंग पार्टनर सौ. श्रुती लुटे-कुलकर्णी म्हणाल्या की, संपत्ती, पैसा, ज्ञान, कला हा ठेवा सोडून आपण इहलोकी जातो. आज जालन्यात दररोज 150 टन कचरा निर्मिती होते, या अनुषंगाने बोलताना त्यांनी आपण वेळीच सजग नागरिक बनलो नाही तर पुढच्या पिढीसाठी कचरा सोडून जाणार का, हा प्रश्न निर्माण होणार आहे, असे सांगितले. प्रक्रिया होत नसल्यामुळे घन आणि द्रवरूप कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत. उन्हाळ्यात या ढिगारांना आग लागते तेव्हा वायु प्रदूषण निर्माण होते. ज्या ठिकाणी या हा कचरा साठवून राहतो त्या जमिनीचा कस संपुष्टात येतो. द्रवरूप कचऱ्यातील अंश जमिनीत मिसळून जलप्रदूषण होते. म्हणजेच या कचऱ्यामुळे जल, वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी मंथन ची आयडिया ॲक्शन बनावी आणि त्यासाठी जनतेने समर्पित भावनेने जालना फर्स्टला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

जालना फर्स्टच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य-मित्तल

जिल्हाधिकारी अशीमा मित्तल म्हणाल्या की,मंथन परिषदेची जालना फर्स्टची संकल्पना अतिशय चांगली असून, त्यांच्या उपक्रमांना जिल्हा प्रशासनाचे सदैव सहकार्य राहील.जालना शहरातील सेवाभावी संस्था चांगल्या पद्धतीने शहर विकासाला हातभार लावत असल्याचा आपणास सार्थ अभिमान आहे, असे सांगून आगामी निवडणुकांमध्ये लोकशाहीच्या बळकटीसाठी जनतेने मतदानाचा टक्का वाढवावा,असे आवाहन केले.

 

जालना फर्स्टचा घनवन प्रकल्प दिशादर्शक- मिन्नू

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. म्हणाल्या की, जालना फर्स्टने जिल्हा परिषद परिसरात राबविलेला घनवन प्रकल्प दिशादर्शक असून, त्यांच्या सर्व उपक्रमांना आमचे सहकार्यालाही. जालना फर्स्ट सोबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अशा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शहर विकासाला आकार मिळेल आणि सौंदर्यकरणात विशेष भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

नदी–हवामान आणि शहर हे परस्पर संबंधाचे शास्त्रीय भान-प्रोफेसर गोसाई

आयआयटी दिल्लीचे प्रा. ए. के. गोसाईन यांनी मंथन परिषदेत ऑनलाईन सहभाग नोंदविला. ते म्हणाले की, नदी, हवामान आणि शहर यांचे नाते परस्परावलंबी आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम नदीच्या प्रवाहावर होत असून, त्याचा परिणाम शहरांच्या पाणीपुरवठा, पूर व्यवस्थापन आणि पर्यावरणावर दिसून येतो. अनियोजित शहरीकरणामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह अडथळले जातात, ज्यामुळे हवामानातील टोकाच्या घटना अधिक तीव्र होतात. त्यामुळे शाश्वत शहरी विकासासाठी नदी व्यवस्थापन आणि हवामान समज यांचा समन्वय अत्यावश्यक आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे गरजेचे- डॉ.यू.के.शर्मा

मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लिमिटेडचे चीफ प्रमोटर व चेअरमन डॉ. यू. के. शर्मा म्हणाले की, जसे आपण पैशाच्या नियोजनासाठी सीए, आरोग्याच्या संरक्षणासाठी डॉक्टरांवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे महापालिकेने पर्यावरण संरक्षणासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे गरजेचे आहे. आपण आतापर्यंत 68 देशांमध्ये जाऊन आलेलो आहे. कचऱ्यांपासून सीएनजी, हायड्रोजन, नायट्रोजन प्रकल्प उभारणी शक्य आहे. अनेक ठिकाणी झालेली आहे. भविष्यात इंधन म्हणून विशिष्ट प्रक्रियेद्वारे कचऱ्याचा वापर शक्य आहे. हायड्रोजन बनविताना त्यातील अमोनिया काढून उर्वरित कचऱ्याचा वापर शेतकऱ्यांना खत म्हणूनही करता येणार आहे. हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकल्यामुळे जे परिणाम जाणवले तेच परिणाम दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे जगाला सहन करावे लागत आहे.

 

जालना युवा फर्स्टचा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद-गौरी मिरासे

इको सत्वच्या को-फाउंडर गौरी मिरासे म्हणाल्या की, तर्कबद्ध पद्धतीने हंगामी वाहणाऱ्या नद्यांची स्वच्छता करणे सहज शक्य आहे. नद्यांमध्ये वाहून येणारा कपड्यांचा, प्लास्टिकचा कचरा वेळच्या वेळी त्याच ठिकाणी वेगवेगळ्या केल्यास अथवा अडविल्यास अनेक समस्या सुटू शकतात. आजकालची युवा मंडळीने पाणी आणि नद्या या समस्यांपासून जवळपास ब्रेकपच घेतला आहे. या समस्यांचा आपल्यावर जसे काही परिणामच होत नाही असे त्यांना वाटू लागले आहे, अशी खंत व्यक्त करतानाच, जालन्यात मात्र जालना फर्स्टच्या युवा मंडळीने याच विषयावर जनजागृती आणि समस्या निवारणासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी औद्योगिक कारखाने आणि विविध प्रकल्पासाठी कसे वापरले जाऊ शकते यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

 

आगामी 20 वर्षे समोर ठेवून कोणताही प्रकल्प डिझाईन केला जावा-अमोल गजरे

एन्व्हर्सिस ग्रीनटेक सोल्युशन्सचे डायरेक्टर अमोल गजरे यांनी सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर यावर प्रभावी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतात 37% सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. आता महाराष्ट्रात हे प्रमाण 70 टक्केवर पोहोचले आहे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. सांडपाण्यावर वेळीच प्रक्रिया केली तर पाण्यापासून होणारे विविध आजार आपण रोखू शकतो. पाण्याच्या पुनर्वापरातून पाण्याची बचत तर होईलच शिवाय जल पातळी वाढविण्यासह जलप्रदूषण रोखण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. जालन्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होतो आहे.आगामी 20 वर्षे समोर ठेवून कोणताही प्रकल्प डिझाईन केला जावा.त्यासाठी सातत्य राखणे, त्यासाठी कुशल टीम, मेंटनन्स आणि चांगली प्रयोगशाळा असायला हवी. ही परिपूर्ण व्यवस्था असल्यास सांडपाणी प्रकल्पातून कृषी, औद्योगिक,सिविल कन्स्ट्रक्शन या प्रकल्पासाठी आपण पाणी पुरवू शकतो,असे त्या म्हणाल्या.

 

पाणी आणि नद्याचे आरोग्य जुळले पाहिजे-डॉ. सुमंत पांडे

वॉटर लिटरसी सेंटरचे (यशदा, पुणे) एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुमंत पांडे यांनी भविष्याच्या दृष्टीने जालना फर्स्ट हवा असेल चांगले प्रशासन, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि समर्पित जनसभागावर भाष्य केले. कुंडलिका सीना नदी पुनरुज्जीवनसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या कार्यामुळे यंदा नदीने पात्र सोडले नाही,असे सांगून पाणी आणि नद्याचे आरोग्य जुळले पाहिजे, असे ते म्हणाले. दूषित पाण्यामुळे गंभीर आजार आणि नको नपुसंकता बळावते असे सांगून,एकीकडे नदीत घाण पाणी सोडायचे आणि दुसरीकडे डायलेसिसद्वारे रक्त शुद्धीवर पैसा खर्च करायचा,हे कितपत योग्य आहे असे ते म्हणाले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मध्ये सर्व काही चांगले नाही त्यासाठी प्लॅन करावा लागेल. त्यासाठी जालना फर्स्ट ला आमची नदियों की पाठशाला टीम सर्वतोपरी सहकार्य करेल,असे त्यांनी आश्वासित केले.

प्रास्ताविक पर भाषणात जालना फर्स्टचे अध्यक्ष गोविंद गोयल म्हणाले की,प्रगती आणि विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याच उद्देशाने जिल्हा प्रशासन, सेवाभावी संस्था, उद्योजक यांना एका प्लॅटफॉर्मर आणणे हा जालना फर्स्ट स्थापनेचा उद्देश आहे. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी सर्व घटकांना एकत्र आणण्यात आले आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी फक्त प्रशासनाची नसून आपणा सर्वांची आहे हाच संदेश आम्ही जालना फस्टच्या माध्यमातून देऊ इच्छितो.स्थापनेनंतर एक ते 15 ऑगस्ट दरम्यान तीस सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.बदलासाठी जलसाहभाग आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी मंथन परिषदेची संकल्पना विशद केली. याप्रसंगी अर्बन प्लॅनर तथा डिझाईनशाला कोलॅबोरेटिव्हचे फाउंडर व प्रिन्सिपल आर्किटेक्ट आशिक जैन,राजेंद्र जावळे यांनीही मार्गदर्शन केले.

प्रारंभी घनश्याम गोयल,संजय अग्रवाल,काजल पटेल,डी.बी.सोनी,डॉ.सौ.अनिता तवरावाला,डाॅ.अनुराधा राख,यश भक्कड आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धवल मिश्रीकोटकर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार विनीत पित्ती आणि रितेश मिश्रा यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!