अंबड (प्रतिनिधी):
बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक स्थिरतेबाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि परिसरात विविध अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद आज अंबड शहरात पाहायला मिळाले. आज सकाळपासूनच अंबड येथील शाखेसमोर नागरिकांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली, ज्यामुळे काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
संस्थेबाबत पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे आपले कष्टाचे पैसे सुरक्षित राहणार की नाही, या काळजीने सामान्य नागरिक,शेतकरी आणि महिलांनी बँकेच्या प्रवेशद्वारावर रांगा लावल्या.अनेक खातेदार मुदत संपण्यापूर्वीच आपल्या ठेवी (एफडी) मोडून रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही दिसत होते. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे बँकेच्या कामकाजावर ताण आला असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनालाही लक्ष द्यावे लागले.
या परिस्थितीवर बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले आहे की, संस्थेची आर्थिक स्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि भक्कम आहे. केवळ जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या अफवांना बळी पडून खातेदारांनी घबराट करून घेऊ नये. खातेदारांचे पैसे सुरक्षित असून अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाईघाईने पैसे काढून आपले व्याजाचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहनही बँकेच्या वतीने करण्यात येत आहे.