जालना हर घर जल घोटाळा विशेष भाग
जालना जिल्ह्यात ‘हर घर जल’ आणि ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांमधील अनियमितता आणि घोटाळ्याबाबत ‘दैनिक सूर्योदय’ ने सातत्याने पुराव्यासह वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रशासनाचे वाभाडे काढले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. “कामात कसूर केल्यास हयगय केली जाणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी संबंधितांना इशारा दिला असून, त्रयस्थ संस्थेने (TATA Consultancy) काढलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
सूर्योदयचा दावा आणि तपासणीतील त्रुटींचा शिक्कामोर्तब
दैनिक सूर्योदयने आपल्या बातम्यांमधून वारंवार स्पष्ट केले होते की, जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवली जात आहेत किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. या दाव्याला आता प्रशासकीय स्तरावरूनही दुजोरा मिळाला आहे. टाटा कन्सलटन्सी या त्रयस्थ संस्थेने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय आणि कामाचा दर्जा सुधारल्याशिवाय कंत्राटदारांचे फावले जाणार नाही,असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
कागदोपत्री कारभाराला चाप:आता जिओ टॅगिंग आणि व्हिडिओ बंधनकारक
“उपअभियंत्यांनी केवळ खुर्चीवर बसून कागदोपत्री कामे करू नयेत,” अशा शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. सूर्योदयने ज्याप्रमाणे ‘ऑन ग्राऊंड’ रिपोर्टिंग करून सत्य बाहेर आणले, त्याच धर्तीवर आता अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान ४ वेळा क्षेत्रभेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग, छायाचित्रे आणि व्हिडिओ अहवालासोबत सादर करण्याचे निर्देश देऊन त्यांनी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा विविध तालुक्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामाची पाहणी करणार असल्याने आता घोटाळेबाज कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
घोटाळ्याचा अहवाल आणि ‘सूर्योदय’चा लढा
जिल्ह्यात ७३३ कामांपैकी ४०० कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत.या प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्येच मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचे सूर्योदयचे म्हणणे आहे.यापूर्वी तत्कालीन सीईओंनी नेमलेली चौकशी समिती आणि मंत्रालयाने पाठवलेली स्मरणपत्रे यावर अद्याप जिल्हा परिषदेने ठोस कृती केली नसली,तरी आता जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मैदानात उतरून ‘ॲक्शन मोड’ धारण केल्याने या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
कारवाईचा बडगा उगारणार
बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ज्या अभियंता आणि कंत्राटदारांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही किंवा निकृष्ट काम केले,त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई प्रस्तावित करावी.
दैनिक सूर्योदयने जनतेच्या पाण्यासाठी आणि हक्काच्या पैशांसाठी जो लढा सुरू केला होता, त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोठे बळ मिळाले आहे.आता खरोखरच शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण पाणी पोहोचते की भ्रष्ट साखळी पुन्हा सक्रिय होते,याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पुढील भाग लवकरच……