सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना: जालना जिल्ह्यातील गाजलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात कारवाईचा धडाका लावला आहे. मुख्य आरोपी तलाठी गणेश मिसाळ याच्यासह आतापर्यंत अनेक संशयितांना आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांचा हा तपास कौतुकास्पद असला तरी, सुखापुरी परिसरात सक्रिय असलेले मिसाळचे ‘ते’ चार ते पाच खाजगी एजंट अद्यापही मोकाटच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून टाकला आहे. गणेश मिसाळच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, प्रत्यक्ष गावात राहून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आणि अनुदानाची रक्कम गोळा करणारे खाजगी एजंट अद्याप पोलिसांच्या कचाट्यात आलेले नाहीत. हे पाचही एजंट सुखापुरी परिसरातील असून, मिसाळच्या गैरव्यवहारात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागातील ‘बड्या माशांना’ जेरबंद करून आपल्या तपासाची ताकद दाखवून दिली आहे. मात्र, हे खाजगी हस्तक बाहेर राहिल्यामुळे तपासात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे एजंट सध्या भूमिगत झाले असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या सक्षम तपासात या खाजगी टोळीला कधी स्थान मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.ज्या वेगाने आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतच्या आरोपींना अटक केली आहे, त्याच वेगाने सुखापुरीतील या पाच हस्तकांच्या मुसक्या आवळल्यास या घोटाळ्यातील शेवटचा दुवा देखील समोर येईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.