“जालना अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार: तपासाला वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे कडक पाऊल;तहसीलदारांच्या चौकशीचे निर्देश.”

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

 

जालना जिल्ह्यात गाजलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आता प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणातील तपासाला गती देण्यासाठी आणि संशयितांची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पोलीस अधीक्षकांना एक विशेष पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये संबंधित तहसीलदारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 

हे प्रकरण गेल्या काही काळापासून चर्चेत असून यामध्ये अतिवृष्टीच्या मदतीसाठी आलेल्या शासकीय निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यापूर्वीच या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक संशयितांची नावे समोर आली आहेत. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी काही महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी होणे अद्याप बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पोलिसांना हे स्मरणपत्र पाठवले आहे.

 

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, हे प्रकरण जुने असून त्यामध्ये गुन्हे आधीच दाखल आहेत. ज्या व्यक्तींची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत किंवा ज्यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे, त्या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पोलीस आरोपपत्र सादर करत नाहीत, तोपर्यंत तपासाचा भाग म्हणून संबंधित तहसीलदारांचीही चौकशी करण्यात येणार आहे.पोलिसांना दिलेले हे पत्र तपासाला गती देण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचार प्रकरणांना वाचा फुटली असून आता पोलीस या चौकशीतून नेमकी काय माहिती बाहेर काढतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

“अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी आणि सत्य समोर यावे, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून संबंधित तहसीलदारांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एफआयआरमध्ये नाव असलेल्या किंवा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी होणे आवश्यक आहे. जोपर्यंत पोलीस या प्रकरणात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करत नाहीत, तोपर्यंत तपासाचा भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू राहील.” -आशिमा मित्तल,जिल्हाधिकारी,जालना.

Leave a Comment

error: Content is protected !!