सूर्योदय वृत्तसेवा|जालना
आपल्या हक्काचा ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडून तब्बल अकरा महिने उलटले आहेत, मात्र अद्यापही या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.सावळा गुंजाळ या पीडित शेतकऱ्याने याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती,परंतु इतका प्रदीर्घ काळ लोटूनही चोरट्यांचा आणि ट्रॅक्टरचा कोणताही सुगावा लागलेला नाही.त्यामुळे प्रशासनाकडून आपल्याला न्याय कधी मिळणार, असा उद्विग्न सवाल आता सावळा गुंजाळ यांनी उपस्थित केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सावळा गुंजाळ यांचा ट्रॅक्टर अकरा महिन्यांपूर्वी अज्ञाताने चोरून नेला होता.शेतीकामासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन असलेला हा ट्रॅक्टर चोरीला गेल्याने गुंजाळ कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेनंतर त्यांनी तात्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवला होता.मात्र,महिनामागून महिने उलटत गेले तरी तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही केवळ तपास सुरू असल्याचे आश्वासन मिळत असल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.
शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर हे केवळ वाहन नसून तो त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार असतो.ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळे शेतीची कामे रखडली असून मजुरीवर होणारा जास्तीचा खर्च आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते यामुळे सावळा गुंजाळ सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे गुन्हेगारी शोधण्यासाठी आधुनिक यंत्रणा आणि तपासाचे दावे केले जात असताना,अकरा महिन्यांपासून एका मोठ्या वाहनाचा शोध न लागणे हे तीर्थपुरी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून तातडीने तपास पूर्ण करावा आणि सावळा गुंजाळ यांना त्यांचा ट्रॅक्टर मिळवून देऊन न्याय द्यावा,अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.