सुखापुरी पोलीस चौकी ‘कुलूपबंद’;अवैध धंद्यांचा सुळसुळाट अन् चोऱ्यांच्या सत्राने नागरिक हवालदिल

 

पोलीस कर्मचारी फिरकतात फक्त ‘हप्ता’ वसुलीसाठी?;सुखापुरीत खाकीचा धाक संपला, गुन्हेगारांचे ‘राज’

 

अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून येथील पोलीस चौकी केवळ शोभेची वास्तू बनली आहे.या चौकीत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणताही पोलीस कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल गगनाला भिडले आहे.परिसरात अवैध धंदे आणि चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना, पोलीस प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘दैनिक सूर्योदय’ने केलेल्या पडताळणीत एक धक्कादायक वास्तव समोर आले असून,येथील पोलीस कर्मचारी केवळ ‘आठवड्याचा हप्ता’ गोळा करण्यासाठीच सुखापुरीत हजेरी लावतात,असा खळबळजनक आरोप आता स्थानिक नागरिकांमधून उघडपणे केला जात आहे.

सुखापुरी हे परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि सामाजिक केंद्र असून,या ठिकाणची शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली होती.मात्र,गेल्या काही महिन्यांपासून ही पोलीस चौकी आता फक्त नावालाच उरली आहे.दिवस असो वा रात्र,या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे दर्शन होणे दुरापास्त झाले आहे. चौकीला कायमचे कुलूप असल्याने तक्रार घेऊन जायचे कुणाकडे आणि दाद कुणाकडे मागायची, अशा विवंचनेत स्थानिक नागरिक अडकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे,ज्या वेळी परिसरात अवैध दारू विक्री,जुगार आणि वाळू तस्करी यांसारख्या धंद्यांचे हप्ते गोळा करण्याची वेळ येते,नेमके त्याच वेळी खाकी वर्दीतील काही महाभाग सुखापुरीत अवतरतात.आठवड्यातून एकदा होणारी ही ‘खास’ फेरी केवळ वसुलीसाठीच असते,हे आता लपून राहिलेले नाही.पोलिसांच्या या आशीर्वादामुळेच अवैध धंदे आता लपून-छपून न चालता दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

परिसरातील चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.शेतीचे साहित्य,विहिरीवरील मोटारी, दुचाकी आणि घराबाहेरून घरगुती वस्तू चोरीला जाण्याचे सत्र अखंडपणे सुरू आहे.गस्तीचा लवलेशही नसल्याने चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की, आता भरवस्तीतही चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे.रात्रीच्या वेळी तर सोडाच, पण दिवसाढवळ्याही नागरिकांना आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची भीती वाटू लागली आहे.वसुलीत मग्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांच्या लुटीशी काहीही देणेघेणे उरले नसल्याचे संतापजनक वास्तव समोर येत आहे. सुखापुरी परिसर गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनत चालले असून,याला सर्वस्वी पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने सुखापुरी पोलीस चौकीच्या या ‘हप्तेखोर’ कारभाराकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. केवळ कागदावर पोलीस चौकी दाखवून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. ज्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्य केवळ वसुलीपुरते मर्यादित आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्या ठिकाणी प्रामाणिक आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ही काळाची गरज आहे. सामान्य जनतेच्या मनात पोलिसांबद्दल असलेला उरलासुरला विश्वास आता उडू लागला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन सुखापुरीतील ‘कुलूपबंद’ कारभार सुधारावा आणि हप्तेखोरीला लगाम घालून अवैध धंद्यांचा कायमचा बिमोड करावा, अशी आग्रही मागणी जनतेच्या माध्यमातून केली जात आहे.

 

भाग २ लवकरच…..

Leave a Comment

error: Content is protected !!