सुखापुरी पोलीस चौकीचा ‘हप्ता’ पॅटर्न; ‘५’ तारखेचा मुहूर्त ठरवणारा तो कर्मचारी कोण?

भ्रष्ट अधिकाऱ्याच्या वसुली डायरीचा हिशोब वरिष्ठांना ठाऊक नाही की जाणीवपूर्वक डोळेझाक?

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

अंबड तालुक्यातील सुखापुरी पोलीस चौकी ही जनतेच्या सुरक्षेसाठी आहे की अवैध धंद्यांच्या वसुलीसाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.’दैनिक सूर्योदय’च्या शोध मोहिमेत एक खळबळजनक वास्तव समोर आले असून,पोलीस चौकीतील एक जबाबदार अधिकारी दर महिन्याच्या ५ तारखेला सुखापुरीतील अवैध धंद्यांच्या वसुलीचा ‘मुहूर्त’ ठरवत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे,चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त असताना,हा अधिकारी मात्र ५ तारखेला आपल्या ‘तिजोरी’ची मोजदाद करण्यात मग्न असतो.या भ्रष्ट साखळीमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली असून,आता या ‘मिस्टर ५ तारीख’ वर वरिष्ठ प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कायद्याची पायमल्ली आणि ५ तारखेचा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार

सुखापुरी परिसरात राजरोसपणे सुरू असणारे अवैध धंदे यांमागे केवळ दुर्लक्ष नसून,जाणीवपूर्वक दिलेले ‘अभय’ असल्याचे स्पष्ट होत आहे.या भ्रष्ट साखळीचा मुख्य सूत्रधार असलेला हा अधिकारी दर महिन्याच्या ५ तारखेला आपला ‘हिशोब’ चुकता करून घेतो. पाच तारीख उजाडताच या अधिकाऱ्याच्या हालचाली गूढपणे वाढतात. जे अवैध धंदेवाले ५ तारखेचा नियम पाळत नाहीत,त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून ‘वरिष्ठांच्या’ डोळ्यात धूळ फेकण्याचे काम हा अधिकारी करत आहे. वर्दीचा वापर केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करणाऱ्या या अधिकाऱ्याने सुखापुरीच्या कायदा व सुव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे.

प्रशासकीय झोप उडवणारे प्रश्न:

सामान्य नागरिकांच्या तक्रारींसाठी चौकीला ‘कुलूप’ असते, मग ५ तारखेला वसुलीसाठी ‘दरवाजे’ कसे उघडतात? जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी यापूर्वी कारवाईचे आश्वासन दिले आहे,मात्र ५ तारखेचा वसुलीचा ‘बाजार’ मांडणारा तो कर्मचारी अद्याप मोकाट कसा? या अधिकाऱ्याचे नाव माहीत असूनही प्रशासन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत का आहे? हे प्रश्न आता जनतेकडून विचारले जात आहेत.जर पोलीसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करणार असतील,तर सामान्य माणसाने दाद कुणाकडे मागायची?

 

भाग ३ लवकरच……

Leave a Comment

error: Content is protected !!