जिल्ह्यात एलपीजी गॅस व इंधन मुबलक प्रमाणात उपलबध;नागरिकांनी आफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात एलपीजी गॅस व इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली असून, यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणत गर्दी करत आहेत. मात्र, जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. अलीकडे काही ठिकाणी गॅस व इंधन टंचाईबाबत चूकीच्या अफवा पसरत असल्याने, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने या अफवांचे खंडन करत, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी आशिमा‍ मित्तल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी गॅस व तेल कंपन्यांना देयके उशिरा अदा केल्याने त्यांना इंधन साठा मिळण्यास थोडा विलंब झाला होता. याचा चुकीचा अर्थ काढून शहरात आणि जिल्ह्यात एलपीजी गॅस व इंधन संपल्याच्या चूकीच्या अफवा पसरल्यामुळे अनेक नागरिक वाहनांमध्ये अतिरिक्त साठा करण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नाही, याची जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे. सोशल मिडिया किंवा इतर माध्यमांतून एलपीजी गॅस व इंधन टंचाईबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध प्रशासनामार्फत कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत.

जिल्ह्यात घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा सुरू असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता शांतता आणि संयम राखावी. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींकडे घरगुती एलपीजी गॅसचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. तसेच पेट्रोल पंपांवरही पेट्रोल आणि डिझेलचा नियमित पुरवठा सुरू असून, कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन साठेबाजी करू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा‍ मित्तल यांनी सांगितले आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!