सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी आज पदाचा कार्यभार स्विकारला.कार्यभार स्विकारल्या नंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचा आढावा घेतला.मिनियार हे मुळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून,त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झाले.मिनियार यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन 1991 मध्ये तहसीलदार परभणी या पदापासून झाली. परिविक्षा कालावधीनंतर तहसीलदार कळंब,जिल्हा धाराशिव व त्यानंतर तहसीलदार अहमदपूर,जिल्हा लातूर येथे काम केले.त्यानंतर पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी रोहयो परभणी, उपविभागीय अधिकारी हिंगोली, निवासी उपजिल्हाधिकारी हिंगोली, निवासी उपजिल्हाधिकारी जालना,उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड,उपजिल्हाधिकारी रोहयो नांदेड,उपविभागीय अधिकारी नांदेड,त्यानंतर सहाय्यक आयुक्त, नरेगा नागपुर येथे काम केले.त्यानंतर पदोन्नतीने अपर जिल्हाधिकारी झाल्यानंतर काही काळ पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत समृद्धी महामार्ग करिता समन्वयक त्यानंतर अपर जिल्हाधिकारी, हिंगोली पदावर काम केले. त्यानंतर पदोन्नतीने विभागीय अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर छत्रपती संभाजीनगर येथे काम केले.
नुकतीच त्यांची नागरी सेवेतील अधिकारी म्हणून पदोन्नतीने भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती झाली आहे.33 वर्षाच्या कार्यकाळात श्री. मिनियार यांनी विविध ठिकाणी विविध प्रकारची कामे केली असुन, त्यांना दीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेड येथील गुरुतागद्दी कार्यक्रमात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच नरेगा आयुक्तालय नागपूर येथे महात्मा गांधी नरेगा योजनेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण काम केले. हिंगोली जिल्हा निर्माण झाल्यानंतर नवनिर्मित जिल्ह्याच्या प्रशासनाची घडी बसविण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग होता.कोविड महामारीच्या काळात विभागीय पातळीवरून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी ऑक्सिजन पुरवठा,औषधी पुरवठा दवाखान्यांमध्ये आधुनिक सोयी-सुविधा देण्यामध्ये समन्वयक या नात्याने त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
प्रशासनात आतापर्यंत कोणतीही चौकशी झालेली नसून, आतापर्यंत त्यांची संपूर्ण सेवा निर्विवादपणे पार पडली आहे. काम करताना सर्व स्तरातील नागरिक, अधिकारी,लोकप्रतिनिधी तसेच माध्यमाकडून चांगले सहकार्य लाभले असून,याठिकाणी ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर येथून बदलीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना या पदाचा त्यांनी कार्यभार स्विकारला आहे.