सीईओ साहेब भ्रष्ट अधिकारीच करणार का स्वतःवरील आरोप सिद्ध?
सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्हा परिषदेने हर घर नल योजनेत अनेक त्रुटी असल्यामुळे जिल्ह्यातील हर घर नल योजना कागदावरच पूर्ण करण्यात आली आहे.या योजनांसाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमत करून हर घर नल योजना ही जिल्ह्यात पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत.त्यामुळे जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाने एका प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.दैनिक सूर्योदय मध्ये या गैरव्यवहाराची सविस्तरपणे वृत्त मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर सगळ्यांचेच या प्रश्नाकडे लक्ष लागले होते त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा झाला आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली असता सदरील प्रकरणाची पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी यांनी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सदर तक्रारीबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी शासनाने सदरील अहवाल मागितल्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली असल्याची माहिती मिळाली आहे या समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत तर पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत.हा सर्व प्रकार पाहता म्हणावे लागेल की उंदराला मांजरीची साक्ष हा असा प्रकार या चौकशी समितीचा चाललाय की काय?
प्रकरण लांबविण्याचा व दडविण्यासाठी हालचाली?
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरील चौकशी नेमताना हे देखील पाहिले नाही की जे या गैरप्रकारात सामील आहेत त्यांच्याकडूनच चौकशी करावी कशी? त्यावरून या चौकशीतील सदस्य स्वतःवरील आरोप कसे सिद्ध करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ही चौकशी समिती स्थापन करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाची फसवणूक तर केली नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.या प्रकरणात अनेकांचा दोष आहे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून होताना दिसत आहे.
समितीची माहिती देण्यास टाळाटाळ
सदर प्रकरणात समिती स्थापन झाल्यानंतर माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने सीईओ यांना कॉल केला असता त्यांनी असे सांगितले की चौकशी समिती स्थापन झाली आहे परंतु या चौकशी समितीत किती सदस्य आहेत व ते कोण कोण आहेत हे सध्या मला सांगता येणार नाही यावरून असे लक्षात येते की ज्यांनी चौकशी समिती स्थापन केली त्यांनाच या चौकशी समितीची माहिती नसावी हे म्हणजे नवलच?
……………
प्रतिक्रिया
१)जालना जिल्ह्यात जर हर घर जल या योजनेत घोटाळा झाला असेल तर या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सभागृहात करणार असून आम्ही देखील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे.
खासदार कल्याण काळे
२)मी महाराष्ट्र विधानसभेमध्ये मा.नरेंद्र मोदी जी यांनी देशातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी अठरापगड जातीच्या लोकांसाठी जल जीवन मिशन मध्ये महाराष्ट्राला आतापर्यंत 50 हजार कोटी रुपये दिले आहेत मात्र राज्यात या योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाली आहे अनियमित्ता झाली आहे जिथे पाण्याचा सोर्स नाही इथे विहिरी खोदले आहेत केंद्र सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणे काम होत नाही महाराष्ट्राचा पैसा पाण्यात गेला आहे विधानसभेत हा प्रखरपणे मुद्दा मांडला आहे जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे नुसत्या समोर समित्या नेमावतात आणि समित्याच पैसे खातात त्यामुळे या समित्या नेमून काय उपयोग मी वारंवार प्रत्येक अधिवेशनात हा विषय मांडत आहे, आणि पुढे ही मांडत राहणार.
बबनराव लोणीकर आमदार परतूर विधानसभा
३) जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन व हर घर जल योजनेत घोटाळा झाला असून या घोटाळ्यासंबंधी हिवाळी अधिवेशनात सभागृहात आवाज उचलणार आहे
नारायण कुचे आमदार अंबड बदनापूर विधानसभा
पुढील भाग लवकरच…..