सूर्योदय वृत्तसेवा|गणेश जाधव
जालना जिल्ह्यातील अंबड तालुका म्हणजे एवढा नशीबवान तालुका म्हणून नावारूपास आला आहे की या तालुक्यातील गावांना हर घर जल हे मॉडेल राज्यात राबवले तर याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होईल. तसेच राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न हे उपस्थित होणार नाही त्यामुळे राज्य सरकारने अंबड तालुक्यातील या हर घर जल मॉडेलचा नक्की विचार करावा. त्याचे कारण असे की अंबड तालुक्यात या योजनेतून २४ तास पाण्याची सोय येथील अधिकाऱ्यांनी करून ठेवली आहे त्यामध्ये नळ फिरवला की लगेच पाणी येते आणि पाण्याची कोणतीही अडचण किंवा पाणीटंचाई नाही त्यामुळे राष्ट्रपती साहेबांनी अंबड तालुक्यातील नशीबवान गावांना व नशीबवान गाव करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर एखादा पुरस्कार जाहीर करावा म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची त्यांना शाबासकी मिळेल.यासह राज्यातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,खासदार,आमदार यांनी अंबड तालुक्यातील हर घर जल घोषित झालेल्या गावांना भेटी देऊन उत्कृष्ट काम कशाप्रकारे केले जाते याचे प्रत्यक्षात पाहणे करावी म्हणजे अंबड तालुक्यातील हर घर जल मॉडेल हे राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल त्यामुळेच राष्ट्रपती महोदयांनी अंबड तालुक्यातील हरघर जल घोषित झालेल्या गावांसाठी एखाद्या पुरस्काराची घोषणा करावी.
अंबड तालुक्यातील सर्वच गावांना अधिकाऱ्यांनी मेहनत करून गावासाठी केलेली कामे खालील प्रमाणे…..
अंबड तालुक्यातील सर्वच गावातील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी ते पण आपल्या अंगणात मिळते.
• गावात सगळीकडे चांगल्या प्रकारची पाईपलाईन टाकण्यात आली आहे
• गावात पाईपलाईन कुठेही गळत नाही ती एकदम योग्य प्रकारे आहे.
• गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळते गावातील 100% कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळते गावातील सर्वांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येतो.
• पाण्याची कॉलिटी केंद्र शासनाच्या बीआयएस १०५०० मानकाप्रमाणे शुद्ध आहे.
• पाणीपुरवठ्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
• पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर खोदण्यात आलेले सर्व रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत.
• गावातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्र,आश्रम शाळा,ग्रामपंचायत इमारत,आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे
• घरातील,गावातील शासकीय संस्था मधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
• पावसाचे पडणारे पाणी जमिनीत पुनर्भरण करण्यात येत आहे, हे सर्व कामे या नशीबवान गावात झालेली आहेत.
पुरस्काराचे मानकरी कोण?
हा सर्व प्रताप गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पाणीपुरवठा विभागास लेखी स्वरूपात दिले आहे. आम्ही काही गावात पडताळणी केली असता यापैकी कोणतेही काम झालेले नसून साधा एक पाईप सुद्धा यामध्ये टाकला नसून ही सरळ सरळ गावकऱ्यांची व शासनाची केलेली फसवणूक आहे त्यामुळे राष्ट्रपती साहेबांनी सदरील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पुरस्कार जाहीर करावा म्हणजे त्यांना आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल.त्यामुळे खालील गावातील व तालुक्यातील अहोरात्र मेहनत करून हर घर जल योजना पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी कोणती पदवी किंवा पुरस्कार देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
……………………
थांबा थांबा वरील माहिती वाचून आपल्याला खूप छान वाटले असेल परंतु सदरील काम हे फक्त कागदावर पूर्ण केले असून यामध्ये दप्तर दिरंगाई करत अधिकाऱ्यांनी टारगेट च्या नावाखाली कगदोपत्री कामे पूर्ण केली आहेत त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंबड तालुक्यातील सुजान नागरिकांनो सर्व सुविधा तुम्हाला मिळतात का हे नक्की कळवा……