सूर्योदय वृत्तसेवा|जालना
एकीकडे अवैध धंदे थांबवण्यासाठी शासनासह जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे.दुसरीकडे गोंदी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्याकडूनच अवैध धंदे करणाऱ्या नागरिकांना बळ देण्यात येत असल्याचे परिसरात बोलले जात आहे.गोंदी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्याचे सोडून लक्ष्मी दर्शन घेऊन कारवाई न करताच वाळूचे ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. त्यामुळे सुखापुरी परिसरात या लक्ष्मी दर्शनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.एकीकडे सामान्य नागरिकांनी एक टोपलं जरी वाळू आणली तर त्यावर कारवाई केली जाते परंतु कुक्कडगाव येथे तीन अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडूनही लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे या तीनही ट्रॅक्टर कारवाई विनाच सोडण्यात आले हा प्रताप करणारे गोंदी पोलीस ठाण्यातील ते दोन कर्मचारी कोण असा सवाल उपस्थित होत आहे.यावरून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल हे या दोन कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सविस्तर माहिती अशी की (१८ एप्रिल शुक्रवार) रोजी गोंदी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी कुक्कडगाव ता.अंबड येथे आले असता त्यांना अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर दिसले त्या ट्रॅक्टरला थांबवून त्यांची विचारपूस करून ट्रॅक्टर मध्ये विनापरवाना वाळू असताना सापडली यावरून गोंदी पोलीस ठाण्यातील त्या दोन कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याचे सोडून सायंकाळी ७ ते ११ या वेळेत बोलणे करून त्यानंतर कारवाई न करताच हे ट्रॅक्टर सोडून दिले.यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखले हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे व या दोन कर्मचाऱ्यावर कामात कुचराई केल्याप्रकरणी काय कारवाई होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.