गुत्तेदाराकडून महसूल विभागाला ‘डावलून’ अवैध मुरूम उत्खनन;महसूल प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

सूर्योदय वृत्तसेवा|अंबड

अंबड तालुक्यातील सुखापुरी तीर्थपुरी रोडवरील सुखापुरी येथे पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चालू असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली आहे यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार असे की संबंधित कंत्राट हे वंडर कंट्रक्शन या संस्थेला देण्यात आले होते परंतु सदरील काम हे दुसरीच अज्ञात कंपनी करत असल्याचे समोर आले यावरून सदरील कामाचा अहवाल वरिष्ठांनी मागवला असून लवकरच यावरही कारवाई होणार असल्याचे सांगितले जाते त्याचबरोबर या कामात आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे सुखापुरी येथे सुरू असलेल्या पूलासाठी गुत्तेदाराने महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता किंवा त्यांना माहिती न देता मोठ्या प्रमाणावर मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.यामुळे या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असतानाही सरकारी अधिकारी या प्रकरणाकडे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष का करत आहेत असा सवालही उपस्थित होत आहे.ही बाब समोर आल्यानंतर महसूल विभागाने याची गंभीर दखल घेतली असून,संबंधित गुत्तेदारावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

सविस्तर माहिती अशी की या गुत्तेदाराकडून मागील काही दिवसांपासून सुखापुरी पाझर तलावातून मुरूमाचे अनधिकृत उत्खनन सुरू आहे हे काम दिवसा ढवळ्या होत असून याकडे महसूल प्रशासन देखील डोळे झाक करत असल्याचा प्रकार समोर येत आहे.मुरूम उत्खननासाठी महसूल विभागाची परवानगी आवश्यक असतानाही ही परवानगी न घेता अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते.मात्र,कोणत्याही प्रकारच्या खनिजाच्या उत्खननासाठी,मग तो मुरूम असो वा इतर खनिज, महसूल विभागाची रितसर परवानगी घेणे आणि त्यापोटी रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे.या प्रकरणात गुत्तेदाराने या नियमांना पूर्णपणे डावलून शासनाला महसुलापासून वंचित ठेवले आहे.

पंचनामा करून गुत्तेदारावर कारवाई करण्यात येईल-तहसीलदार चव्हाण

या अवैध मुरूम उत्खननाप्रकरणी तहसीलदार चव्हाण यांनी तात्काळ याची दखल घेतली आहे.”आम्हाला सुखापुरी पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खनन झाल्याची माहिती मिळाली आहे,आणि यासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.ही बाब अत्यंत गंभीर आहे.आम्ही तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून उत्खनन केलेल्या मुरूमाचे मूल्यांकन करू.दोषी गुत्तेदारावर महसूल कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्याच्याकडून बेकायदेशीररित्या काढलेल्या मुरूमाची किंमत वसूल केली जाईल,”असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले.अशा प्रकारे महसूल विभागाला डावलून होणाऱ्या अवैध खनिजांच्या उत्खननामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होते.भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महसूल विभाग अधिक सतर्क राहील आणि अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचाही तपास केला जाईल असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

 

Leave a Comment

error: Content is protected !!