सरकारी अनुदानात २४ कोटींचा घोटाळा:महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या अनुदानात मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी १९ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून,यामध्ये २८ आरोपींचा समावेश आहे.या आरोपींमध्ये महसूल अधिकारी,नेटवर्क इंजिनियर आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्ह्याचा तपशील

हा गुन्हा १९ जुलै २०२४ ते १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.अंबड आणि घनसावंगी तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात हा गैरव्यवहार झाला आहे.या प्रकरणी विलास मल्हारी कोमटवार यांनी फिर्याद दाखल केली असून,ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबड येथे सहायक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

घोटाळ्याची पद्धत

बनावट लाभार्थी तयार करणे: आरोपींनी संगनमत करून शेती नसलेल्या लोकांना किंवा इतर तालुक्यातील/जिल्ह्यातील लोकांना अनुदान दिले.

गैरवापर:तहसीलदार यांच्या लॉगिन आयडीचा वापर करून ई-पंचनामा पोर्टलवर बोगस नोंदी करण्यात आल्या.

फसवणूक:कमी शेती असताना जास्त शेती दाखवून फळबागांसाठी अतिरिक्त अनुदान लाटण्यात आले.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न:घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी नैसर्गिक आपत्ती अनुदानाशी संबंधित कागदपत्रे आणि संगणकातील पुरावे नष्ट केले.

या गैरव्यवहारात शासनाचे तब्बल २४,९०,७७,८११/- (चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा रुपये) रुपयांचे नुकसान झाले आहे. आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार करून आणि संगणक प्रणालीचा गैरवापर करून हा अपहार केला,असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

आरोपींची यादी

या प्रकरणात २८ आरोपींची नावे समोर आली आहेत.त्यात गणेश रुबिंदर मिसाळ,कैलास शिवाजीराव घारे, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर,बाळु लिंबाजी सानप,पवनसिंग हिरालाल सुलाने,शिवाजी श्रीधर ढालके,कल्याणसिंग अमरसिंग बमनावत,सुनिल रामकष्ण सोरमारे,मोहित दत्तात्रय गोषिक,चंद्रकांत तुकाराम खिल्लारे,रामेश्वर नाना जाधव,डिगंबर गंगाराम कुरेवाड,किरण रविंद्रकुमार जाधव, रमेश लक्ष्मण कांबळे,सुकन्या श्रीकृष्ण गवते, विजय हनुमंत जोगदंड, निवास बाबुसिंग जाधव,विनोद जयजयराम ठाकरे, प्रविन भाऊसाहेब शिनगारे,बप्पासाहेब रखमाजी भुसारे आणि सुरज गोरख बिक्कड या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी),वैभव विशंभरराव आडगावकर (नेटवर्क इंजिनियर),विजय निवृत्ती भांडवले (तत्कालीन संगणक परिचालक),रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक),आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी),आणि दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी) यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार आहेत का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!