सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून,नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक कामांसाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच तासांत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट (Thunderstorm and Lightning) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेल्या महत्त्वाच्या सूचना:
अनावश्यक प्रवास टाळा:पुढील चार ते पाच तास कोणत्याही अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नका.
घरी सुरक्षित राहा:काम नसल्यास नागरिकांनी घरीच थांबावे.
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर:जर आपल्या घरात पाणी भरले असेल, तर जवळच्या जिल्हा परिषद शाळा किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित हॉलमध्ये (सेफ ठिकाणी) तातडीने स्थलांतरित व्हावे.
प्रशासनाचे सहकार्य:प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून,सर्व लोकप्रतिनिधी,माननीय आमदार आणि खासदार साहेबांनाही या संकटाविषयी कळवण्यात आले आहे.नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्याही सहकार्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा