अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; जालना जिल्हा काँग्रेसचे तीव्र धरणे आंदोलन,सरकारला मोठा इशारा

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

जालना: जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने व भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, चमन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत सरकारच्या निष्क्रियतेवर आपला संताप व्यक्त केला.आंदोलनानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात काँग्रेसने स्पष्ट केले आहे की,राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी मोठे संकट भोगत आहेत, मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.त्यामुळे पीक नुकसानीचे सरसगट पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. यासोबतच, नुकसानीची माहिती दडपून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि केंद्र सरकारने तात्काळ १००% अनुदानावर मदत पॅकेज द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींना NDRF किंवा SDRF मधून ५ लाखांची विनाअट मदत करण्याची मागणीही निवेदनात नमूद आहे.

यावेळी बोलताना खासदार डॉ.कल्याण काळे यांनी प्रशासनाला व सरकारला स्पष्ट इशारा दिला की, जर शेतकऱ्यांना योग्य मदत तात्काळ दिली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध मोठे आंदोलन करेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.आंदोलनानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करणारे गजानन उगले यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला.या आंदोलनात आणि निवेदन सादर करताना खासदार डॉ. कल्याण काळे,जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र राख, किसान काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष नारायण वाढेकर,जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान यांच्यासह ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे,इब्राहिम शेख,शकील शेख,बदर भाई चाउस,अब्दुल रऊफ परसूवाले तसेच इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!