सूर्योदय वृत्तसेवा|जालना
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव आणि परिसरात शासनाचे सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून १०० कोटींहून अधिक रकमेची बेकायदेशीर प्लॉटिंग करून त्यांची खुलेआम विक्री केली जात असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सुमारे २० हजार लोकसंख्या असलेले आणि २५ ते ३० गावांचा केंद्रबिंदू असलेले कुंभार पिंपळगाव येथे मोठी व्यापारीपेठ असून, गावातून दोन महामार्ग गेले आहेत. गावाचा चारही बाजूंनी वेगाने विस्तार होत असताना, या संधीचा फायदा घेत जवळपास २५ ते ३० ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंगला ऊत आला आहे.विशेष म्हणजे,या प्लॉटिंगसाठी ‘एन.ए.’ (Non-Agricultural) करण्याची किंवा शासनाची कोणतीही आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नाही.
कुंभार पिंपळगाव व गावालगत कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर प्लॉटिंग झाली असून अजूनही ती सातत्याने सुरूच आहे. गावातून गेलेल्या पाचोड-अंबड-घनसावंगी-कुंभार पिंपळगाव-आष्टी आणि रांजणी ते कुंभार पिंपळगाव – उक्कडगाव या दोन्ही महामार्गांसह इतर लहान-मोठ्या रस्त्यांवर नियम मोडून प्लॉटिंग केली गेली आहे. नियमानुसार, एन.ए. केल्याशिवाय प्लॉटिंग करता येत नाही,हे अधिकारी देखील मान्य करतात;तरीही येथे जमिनी खरेदी करून उभ्या-आडव्या रेषा मारून बेकायदेशीरपणे प्लॉट विक्री सुरू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंगसाठी जमिनी खरेदी करणाऱ्यांकडे एवढा पैसा येतोय कुठून? तसेच ब्लॅक मनीचा वापर होत आहे का आणि या प्लॉटिंगचे फायनान्सर कोण आहेत,असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित केले जात आहेत.
या बेकायदेशीर प्लॉटिंगला नुकतेच शेतकरी अनुदान घोटाळ्यात निलंबित झालेले कुंभार पिंपळगावचे ग्रामसेवक (ग्रा.पं. अधिकारी) यांचा विशेष आशीर्वाद लाभला असल्याची चर्चा आहे.कारण,नियमां शिवाय काढलेल्या प्लॉटची सर्वात आधी बेकायदेशीर नोंद ग्रामपंचायतला केली जाते आणि त्यानंतरच रजिस्ट्र्रीची प्रक्रिया पुढे सरकते. ग्रामपंचायत स्तरावर नोंद झाल्यावर, दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफिस) येथे या प्लॉटची रजिस्ट्र्री केली जात आहे. रजिस्ट्र्री ऑफिसला सामान्यपणे चौकशी केल्यास रजिस्ट्री बंद असल्याचे सांगितले जाते,पण ‘अंधारातून घेणं-देणं’ करून कार्यक्रम फत्ते केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अनेकदा संबंधित अधिकारी सुट्टीवर असताना मोठ्या प्रमाणात रजिस्ट्री होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
गावात १०० कोटींची बेकायदेशीर प्लॉटिंग उघडकीस आल्याने,जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुद्रांक जिल्हाधिकारी,आणि बीडीओ यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कुंभार पिंपळगावच्या जनतेतून होत आहे. प्रशासन या गंभीर प्रकरणी काय भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.