जालना वन विभागाच्या परवानगी फक्त कागदावरच? ताडहदगावमधील वृक्षतोडीनंतर एकाही रोपाची लागवड नाही.

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी अंबड तालुक्यातील ताडहदगाव येथील जमिनीवरील १९४० झाडे तोडण्यास मिळालेल्या परवानगीनंतर,संबंधित महावितरण विभागाने पर्यावरणाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करत अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी, जालना (दक्षिण) यांच्याकडून २७/०३/२०२५ रोजी मिळालेल्या परवानगीनुसार, उप कार्यकारी अभियंता,महावितरण,जालना यांच्यावर तोडलेल्या झाडांच्या संख्येएवढीच नवीन झाडे आणि एकूण झाडांच्या पाचपट नवीन झाडे लावणे बंधनकारक होते. हे पुनर्रोपण सन २०२५ च्या पावसाळ्याचा हंगाम संपण्यापूर्वी करणे बंधनकारक होते.

मात्र,परवानगी पत्रातील ही अत्यंत महत्त्वाची अट महावितरण विभागाने पूर्णपणे पायदळी तुडवल्याचे उघड झाले आहे. ताडहदगाव येथील गट क्रमांक ४८२ मध्ये १९४० झाडे (यात लिंब-१६, ग्लीरीसीडीया-१९०१, बाभुळ-२३ यांचा समावेश होता) तोडण्यात आली, परंतु आजपर्यंत त्या जागी एकाही नवीन रोपाची लागवड करण्यात आलेली नाही. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे केवळ सरकारी नियमांचेच उल्लंघन झालेले नाही, तर परिसरातील हरित आवरण नष्ट होऊन पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे.

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम,१९६४ मध्ये वृक्षतोड झाल्यावर पुनर्रोपण न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे, तसेच विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. सरकारी विभागाकडूनच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कायद्याचे खुलेआम उल्लंघन होत असताना, वन विभाग यावर काय आणि कधी कारवाई करणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी करत आहेत. वन विभागाने तातडीने याची गंभीर दखल घेऊन संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि त्वरित पुनर्रोपणाचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पुढील भाग लवकरच….

Leave a Comment

error: Content is protected !!