बोगस लाभार्थी व एजंट वर होणार फौजदारी गुन्हे दाखल; तहसीलदार विजय चव्हाण
सूर्योदय वृत्तसेवा|अंबड
जालना जिल्ह्यातील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आता अंबड तहसीलदार कार्यालयाने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासकीय चौकशीत बोगस आणि अपात्र ठरलेल्या शेकडो लाभार्थ्यांना तहसीलदार यांनी नोटीस बजावून वसुलीची कारवाई सुरू केली आहे.या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते, ज्यात महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चुकीच्या खात्यांवर शासनाचे अनुदान वर्ग केले होते.
अंबड तालुक्यातील ज्या व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने किंवा बोगस कागदपत्रांच्या आधारे अतिवृष्टीचे अनुदान (नुकसान भरपाई) मिळवले आहे, अशांना या नोटीस देण्यात आल्या आहेत.या नोटीसद्वारे संबंधितांना मिळालेले शासकीय अनुदान तत्काळ शासकीय तिजोरीत जमा करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.निर्धारित मुदतीत अनुदान परत न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि मालमत्तेची जप्ती करून कायदेशीर मार्गाने वसुली करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल,असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.या कारवाईमुळे प्रशासनाने या घोटाळ्यात थेट सहभागी नसलेल्या, परंतु अनधिकृतपणे अनुदान प्राप्त केलेल्या व्यक्तींवरही कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.ही कारवाई जालना जिल्ह्यातील या मोठ्या घोटाळ्याला नियंत्रित करण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान परत मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.