५ महिलांसह १०८ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे कै.पंढरीनाथ (भाऊ) शिसोदे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव विद्या मंदिर,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान व शांताई बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण १०८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले.कै.पंढरीनाथ (भाऊ) शिसोदे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी १ ते ७ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक व क्रीडा सप्ताह साजरा केला जातो.या सप्ताहातील एक महत्त्वाचा समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या शिबिराला महिलांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ५ महिलांनी रक्तदान करून समाजास प्रेरणादायी संदेश दिला.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्या जे.डब्ल्यू.दांडगे यांच्या हस्ते झाले.उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात,“आजच्या काळात रक्तदान ही अत्यावश्यक गरज बनली आहे.गंभीर आजार,अपघात व शस्त्रक्रियांच्या वेळी रक्ताची तातडीने आवश्यकता भासते.रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतात.यासोबतच रक्तदान करताना आवश्यक आरोग्य तपासण्या होतात.रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नाही,”असे सांगत उपस्थित रक्तदात्यांना प्रेरित केले.
या शिबिराचे आयोजन शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.व्ही.छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रक्तसंकलनाची जबाबदारी दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.रक्तसंकलनाच्या कार्यात कृष्णा कुलकर्णी,शीतल पवार,राधा पठाडे,आरती बामणे,नैना जाधव,ज्ञानेश्वर भालेकर,अनिता नांदरकर,दुर्गा वाघ,सखुबाई जाधव व सतीश वानोळे यांनी निष्ठेने सहभाग नोंदवला.
या उपक्रमास ग्रामस्थ,शिक्षक,विद्यार्थी-विद्यार्थिनी,युवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व रक्तदाते,आयोजक,वैद्यकीय पथक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले.समाजोपयोगी उपक्रमातून मानवतेचा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर वडीगोद्री परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरले.