सूर्योदय वृत्तसेवा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता या प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदानाच्या काही दिवस आधी एवढी मोठी रक्कम वितरित करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
काँग्रेसची आक्षेपार्ह तक्रार:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसांनी १० जानेवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे.
सामूहिक लाच असल्याचा आरोप
निवडणुकीच्या तोंडावर १ कोटीहून अधिक महिलांना पैसे देणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे असून ही एक प्रकारची ‘सरकारी लाच’ असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, मात्र निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे वितरित करावेत, असे निर्देश आयोगाने सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
महिलांची प्रतीक्षा वाढणार?
राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता आणि वितरणाची तयारी पूर्ण केली होती. परंतु,आता निवडणूक आयोग या तक्रारीवर काय निर्णय घेणार, यावर महिलांना हे पैसे संक्रांतीपूर्वी मिळणार की निवडणूक संपल्यानंतर, हे अवलंबून असेल. जर आयोगाने स्थगिती दिली, तर हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.