सूर्योदय वृत्तसेवा|अंबड
निसर्गाचे काही खेळ विज्ञानालाही कोड्यात टाकणारे असतात आणि याचाच प्रत्यय अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे येत आहे.येथील अवघ्या १५ वर्षे वयाची मुलगी आणि मृत्यू यांच्यात सध्या जणू काही लपंडावच सुरू आहे.गेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत या मुलीला चक्क सात वेळा सापाने दंश केला आहे.एकाच मुलीचा साप वारंवार पिच्छा का पुरवत आहे,हे अजब रहस्य संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले असून या घटनेने मुलीच्या कुटुंबासह संपूर्ण गावकरी दहशतीखाली वावरत आहेत.प्रत्येक वेळी सापाने चावा घेतल्यानंतर ही मुलगी मृत्यूच्या दारातून सुखरूप परतली असली, तरी या अजब वारंवारतेमुळे तिच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे.
या धक्कादायक घटनेच्या मागे एक अत्यंत विदारक आर्थिक परिस्थिती दडलेली आहे.या मुलीचे वडील कृष्णा धोंडीराम राठोड यांची कौटुंबिक स्थिती अत्यंत नाजूक असून त्यांचे पूर्णपणे हातावर पोट आहे.शेतमजुरी आणि मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कृष्णा राठोड यांच्यावर निसर्गाने जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. अवघ्या ९० दिवसांत मुलीला सात वेळा दवाखान्यात नेण्याची वेळ आली. प्रत्येक वेळी तिचा जीव वाचवण्यासाठी कृष्णा राठोड यांनी ऐपत नसतानाही कर्ज काढून, लोकांकडून उसनवारी करून मोठी आर्थिक ओढाताण केली आहे. मात्र, आता वारंवार होणाऱ्या दवाखान्याच्या खर्चामुळे हे राठोड कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून त्यांच्याकडे मुलीच्या पुढील उपचारासाठी आता एक छदामही शिल्लक उरलेला नाही.
१५ वर्षांच्या या चिमुरडीची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अत्यंत काळजाला घर पाडणारी आहे.सात वेळा सर्पदंश होऊनही जिद्दीने जगणाऱ्या या मुलीला वाचवण्यासाठी आता केवळ नशिबाचीच नाही,तर आर्थिक मदतीचीही नितांत गरज आहे. घराची परिस्थिती इतकी हलाखीची आहे की,उद्याच्या पोटाची भ्रांत असताना सापाच्या या अजब दहशतीतून मुलीला सुरक्षित कसे ठेवावे,हा प्रश्न वडिलांना सतावत आहे.सापाचा हा ससेमिरा कधी थांबेल हे माहीत नाही,पण गरिबीमुळे या मुलीचे उपचार थांबू नयेत,अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
या अत्यंत संवेदनशील आणि अजब प्रकरणाची दखल आता समाजाने घेणे गरजेचे आहे.स्थानिक राजकारणी,लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी कृष्णा धोंडीराम राठोड यांच्या मदतीसाठी तात्काळ पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.एका गरीब बापाची लेक वाचवण्यासाठी आणि या अजब संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी किंवा दानशूर संस्थांनी मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च उचलल्यास तिला नवजीवन मिळू शकेल. समाजातील दानशूर व्यक्तींनी वेळीच या कुटुंबाला मदतीचा हात न दिल्यास,विज्ञानाला कोड्यात टाकणाऱ्या या अजब घटनेचा अंत अत्यंत दुर्दैवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.