सूर्योदय वृत्तसेवा|अंबड
शासनाकडून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी लोकाभिमुख आणि गतिमान शासन चालविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.शेतकरी, वंचित व सामान्य नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे.तरी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महसूल सप्ताह-2025 चा जिल्हास्तरीय समारोप समारंभ कार्यक्रम अंबड येथील मत्स्योदरी मंगल कार्यालयात शुक्रवार दि.8 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर,आमदार अर्जुनराव खोतकर,आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम,पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार,निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की,महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शेतकरी व सामान्य जनतेची बरीचशी कामे मंडळ स्तरावर पुर्ण करण्यात आली आहेत.शासनाने लोकाभिमुख,पारदर्शी आणि कार्यक्षम भूमिका स्विकारली आहे.शासनाकडून विकसित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यात येत असून वर्ष 2047 पर्यंत सर्वोत्तम भारताचा संकल्प करण्यात आलेला आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप आहेत त्यांना पुढील 5 वर्षे विजेचे बिल येणार नाही.विजेचा दर प्रत्येक वर्षी 10 टक्क्याने वाढत असतो परंतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वर्ष-2029 मध्ये विजेचा दर केवळ 6 रुपये म्हणजे 50 टक्क्यावर आणला जाणार आहे.शैक्षणिक कागदपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही प्रमाणपत्र काढतांना ही सुट देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात 30 लाख घरे दिली जाणार असून त्या सर्व घरकुलांना 5 ब्रास वाळु घरपोच मोफत दिली जाणार आहे.एम-सॅण्ड धोरणानूसार कृत्रिम वाळु निर्मितीसाठी एका जिल्ह्यात 50 क्रेशर देण्याचे नियोजन आहे.पुढील पाच वर्षात सर्व शासकीय बांधकामे ही कृत्रिम वाळुपासून बांधण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांचा शेतरस्ता 12 फुटाच्या कमी असणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे. महसूल विभागातील नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात फेसॲपद्वारे हजेरी घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध लाभाच्या योजनेसाठी यापुढे आता ॲग्रिस्टॅक नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की,दि.1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान,वृक्षलागवड,विविध दाखल्याचे वितरण,डिबीटीद्वारे लाभ,शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे यासारखी कामे करण्यात आली.तसेच दि.17 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जनसप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून मत्स्योदरी देवीच्या मंदिरासाठी 40 कोटी रुपयांचा प्रस्ताव पर्यटनमध्ये समावेशासाठी पाठविला आहे तो मंजूर करावा तसेच अंबड येथील पाणी पुरवठा योजना मार्गी लावावी, अशी आग्रही मागणी आमदार नारायण कुचे यांनी केली.
यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेले अधिकारी-कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसास धनादेशाचे वाटप करण्यात आले. स्वयंसहाय्यता बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.स्व.गोपिनाथराव मुंडे सानुग्रह अनुदानाचे व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थींना लाभाचे वितरण करण्यात आले.दिव्यांगांना अत्योंदय शिधापत्रिकेचा लाभ तर प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र तसेच भूमि अभिलेख विभागाकडून सनदीचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पाणंद रस्ते प्रश्न मार्गी लावल्याबद्दल तहसीलदार विजय चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे,उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्यासह जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी,नागरिक, शेतकरी,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.