संत रामदास कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

 

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने संत रामदास कॉलेज ऑफ फार्मसी, घनसावंगी येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून शिक्षक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘एक दिवस शिक्षक’ हा अभिनव उपक्रम राबविला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध वर्गांमध्ये शिक्षकांची भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या तासिका घेतल्या. यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण,आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जबाबदारीची जाणीव विकसित होण्यास मदत झाली.यावेळी एका विद्यार्थिनीने प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत महाविद्यालयाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून केलेले अध्यापन आणि महाविद्यालयीन कामकाजातील सहभाग हा उपक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.दिवसभराच्या तासिकांनंतर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत मांडले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षक-विद्यार्थी नात्याचे महत्त्व, शिक्षणातील मूल्ये, शिस्त, संस्कार आणि भविष्यातील जबाबदाऱ्या याबाबत विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.परदेशी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून डॉ.परदेशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार,शिस्त,सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास एजाज शेख, प्रा.ज्ञानेश्वर ढवळे, प्रा. पूजा तौर,प्रा.अजय मुळे,प्रा.अजय शेजुळ, प्रा.ऋषिकेश सोळुंके, प्रा. पायल राठोड यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘एक दिवस शिक्षक’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव झाली तसेच अध्यापन क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!