अंबड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्कचे कर्मचारी कारवाईसाठी की ‘हप्ते वसुली’साठी?

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

अंबड तालुक्यात सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. विभागाचे ठराविक कर्मचारी प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखे दरम्यानच तालुक्यासह ग्रामीण भागात फिरताना दिसत असल्याने, ही मोहीम अवैध धंद्यांवर कारवाईसाठी असते की केवळ ‘हप्ते वसुली‘साठी, असा थेट सवाल आता नागरिकांतून विचारला जात आहे. एकीकडे तालुक्यातील अनेक बियर बार आणि परमिट रूममध्ये खुलेआम देशी दारूची विक्री होत असताना विभागाने डोळेझाक केली असून, दुसरीकडे केलेल्या कारवायांची माहितीही पत्रकारांपासून लपवली जात असल्याने या संपूर्ण कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अंबड तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक बियर बार आणि परमिट रूममध्ये शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. परवानगी नसतानाही या ठिकाणी देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.या अवैध विक्रीला आळा घालण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असताना, प्रत्यक्षात मात्र विभागाचे कर्मचारी केवळ महिन्याच्या ठराविक तारखांनाच (१ ते १० तारीख) परिसरात हजेरी लावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे विभागाच्या या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

कारवाया फक्त पोर्टलवरच;प्रेस नोट देण्यास टाळाटाळ का?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पारदर्शकतेवरही आता शंका घेतली जात आहे. तालुक्यात विभागाकडून ज्या काही मोजक्या कारवाया केल्या जातात,त्यांची नोंद केवळ त्यांच्या अधिकृत पोर्टलवर ‘एफआयआर’ (FIR) स्वरूपात दाखवली जाते. मात्र,या कारवायांची कोणतीही अधिकृत प्रेस नोट किंवा माहिती स्थानिक पत्रकारांना दिली जात नाही. इतर शासकीय विभागांप्रमाणे माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास उत्पादन शुल्क विभाग का कचरतो? यामागे केवळ कागदोपत्री कारवाया दाखवून वरिष्ठांना खूश करण्याचा आणि प्रत्यक्षात अवैध धंद्यांना अभय देण्याचा हेतू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवून परमिट रूममध्ये देशी दारू विकली जात असताना,विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अंबड तालुक्यातील अवैध विक्रीवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करावी,अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.

 

भाग २ लवकरच……

Leave a Comment

error: Content is protected !!