दुष्काळातही शेतकऱ्यांच्या उसाला ‘समृद्धी’ कारखाना देणार उच्चांकी भाव – सतीश घाटगे पाटील

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

गेल्या चार वर्षांपासून समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देत आला आहे. यंदा दुष्काळाचे संकट असले तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी कारखाना भक्कमपणे उभा राहणार असून यावर्षीच्या उसाला देखील उच्चांकीच भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी केली आहे. तसेच यावर्षी गाळप होणाऱ्या उसाला ठरणाऱ्या दराव्यतिरिक्त ३०० रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची मोठी घोषणा देखील त्यांनी केली आहे.शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या नेतृत्वाखाली फक्त २०० दिवसांत समृद्धी कारखान्याने दुसरे युनिट उभे केले. गुरुवारी (दि.१५) सतीश घाटगे व महेंद्र मेठी यांच्या हस्ते मोळी पूजन करून युनिट नंबर १ व युनिट नंबर २ च्या ऊस गाळपाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. *या कार्यक्रमास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिलीप फलके, संचालिका वैशाली घाटगे, रिंकीताई मेठी, संचालक अभिजित उढाण, रंजित उढाण, जितेंद्र भैया मेठी, विकी शिंदे, मुख्य शेतकरी अधिकारी अमोल तौर, फैक्टरी मैनेजर आर.एस. माथनकर, चीफ केमिस्ट सुमितकुमार माथुर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समृद्धीच्या दोन युनिट्समुळे कारखान्याची गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टन झाली आहे. त्यामुळे यंदा १०० ते १२० दिवसांत सगळ्या शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप पूर्ण होणार आहे. दुष्काळामुळे ऊस पीक वाळून जात असल्याने पाणी नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. कारखान्याने ७५० ऊसतोड टोळ्यांचे नियोजन केले असून प्रत्येक गावात ऊसतोड यंत्रणा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसानीच्या भीतीने बाहेरच्या कारखान्यांना ऊस न देण्याचे आवाहनही सतीश घाटगे यांनी केले.उसाचे पीक वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायची वेळ आली तरी मागे हटणार नाही. डाव्या कालव्याला ४ आवर्तने मिळेपर्यंत आपण सरकार आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना प्रति टनामागे ३०० रुपयांपर्यत अनुदान

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सतीश घाटगे यांनी यावेळी केली.ज्या शेतकऱ्यांचा ऊस १ ते १५ जानेवारी दरम्यान गाळप होईल त्यांना ५० रुपये प्रति मे.टन,१६ ते ३० जानेवारीदरम्यान गाळप झाल्यास १०० रुपये,१ ते १५ फेब्रुवारीदरम्यान २०० रुपये आणि १६ ते हंगाम संपेपर्यंत गाळप झालेल्या उसासाठी ३०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याने केले आहे.

दिवाळीत १०० रुपयांचा वाढीव हप्ता

दुष्काळी संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या उसासाठी दिवाळी सणासाठी १०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे वाढीव हप्ता देण्यात येणार आहे. हा अंतिम हप्ता नसून दिवाळीनंतर अंतिम हप्ता जाहीर करण्यात येणार असल्याचे सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. गाळप हंगाम २०२५-२६ च्या उसाला आतापर्यंत २९०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे. त्यात १०० रुपयांचा तिसरा वाढीव हप्ता दिवाळीत देण्यात येणार आहे.

दुष्काळी गावांना समृद्धी कारखाना घेणार दत्तक

समृद्धी साखर कारखाना प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहत आला आहे. यावर्षी आलेल्या दुष्काळाच्या संकटातही समृद्धी कारखाना सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त ५ गावांना दत्तक घेणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. दत्तक घेतल्या जाणाऱ्या गावांत आवश्यक सर्व सोयी-सुविधा कारखाना स्वखर्चातून पुरविणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!