कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून;गोंदी पोलिसांची तत्पर कारवाई,संशयित आरोपी अवघ्या काही तासांत ताब्यात

सूर्योदय वृत्तसेवा

दारूच्या नशेत आई-वडील आणि लहान भावाला सतत होणाऱ्या त्रासातून व कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगर्डे हदगाव येथे घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गोंदी पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेतले.

शेतातील आखाड्यावर आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मौजे घुंगर्डे हदगाव शिवारातील जगन अश्रुबा काकडे यांच्या शेतातील आखाड्यावर त्यांचा मोठा मुलगा तुकाराम जगन काकडे (वय २६ वर्षे) याचा गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले,पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे,पोलीस उपनिरीक्षक किरण हावले व पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

गुन्हा दाखल होण्याआधीच तपासाची चक्रे फिरवली

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच गोपनीय माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन सखोल व गोपनीय चौकशी केली असता,या घटनेमागे तीव्र कौटुंबिक वाद असल्याची माहिती समोर आली.मयत तुकाराम काकडे हा दारूच्या आहारी गेला होता. तो सतत दारूच्या नशेत आई-वडील तसेच लहान भावाला शिवीगाळ करून वारंवार बेदम मारहाण करत असे.

कुऱ्हाडीने वार करून संपवले जीवन

घरातील याच त्रासाला कंटाळून मयताचा लहान भाऊ रामेश्वर जगन काकडे (वय २२ वर्षे) याने सोमवारी (२६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास शेतातील आखाड्यावर तुकाराम याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. संशय बळावताच पोलिसांनी रामेश्वर काकडे यास तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पुढील कायदेशीर चौकशी सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय आणि तत्पर कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, अंबड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले,पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले तसेच पोलीस अंमलदार बालाजी पदमाने,अंमलदार हावले,सिद्दीकी,भोजने,भवरे व खरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!