सूर्योदय वृत्तसेवा
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची यादी जाहीर झाल्यानंतर आता पात्र शेतकऱ्यांसाठी आधार ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. घाईगडबडीत चुकीची माहिती स्वीकारल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या कर्जमाफीच्या पोर्टलवर दाखवण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत आणि प्रत्यक्षातील कर्जाच्या रकमेत मोठी विसंगती दिसून येत आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कर्ज दीड लाख रुपये असताना पोर्टलवर केवळ साठ हजार रुपये दाखवले जात आहे, तर दोन लाख रुपये कर्ज असलेल्यांना एक लाख रुपयांचीच रक्कम दिसत आहे. काही प्रकरणात कर्ज एक लाखाचे असताना पोर्टलवर एक लाख तीस हजार रुपये रक्कम दाखवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २० ते २५ टक्के शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याच्या रकमेत अशा प्रकारची तफावत आढळत आहे.
जर शेतकऱ्यांनी ही तफावत न तपासता किंवा पोर्टलवर दिसणारी चुकीची रक्कम घाईत मान्य करून केवायसी पूर्ण केली,तर भविष्यात शासनाकडून मिळालेल्या रकमे व्यतिरिक्त उर्वरित राहिलेले कर्ज शेतकऱ्यांना स्वतः बँकेत भरावे लागू शकते.त्यामुळे केवायसी करताना सर्वप्रथम आपला कर्ज खाते क्रमांक आणि पोर्टलवर दाखवलेली कर्जाची रक्कम व्यवस्थित तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
जर पोर्टलवरील सर्व माहिती आणि रक्कम योग्य असेल,तरच ती मान्य करून केवायसी पूर्ण करावी.परंतु रकमेत तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी ‘नाही’ हा पर्याय निवडून ऑनलाइन पद्धतीने आपली तक्रार दाखल करावी. तसेच या संदर्भात आपल्या संबंधित बँक शाखेशी किंवा सहकार उपनिबंधक आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.दाखल झालेल्या तक्रारींचे निवारण झाल्यानंतर पोर्टलवर आवश्यक दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पुन्हा केवायसीचा योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण खात्री करूनच आपली केवायसी पूर्ण करावी.