शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त;एकावर गुन्हा दाखल
सूर्योदय वृत्तसेवा|अंबड
शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या बाजारात बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ६ लाख ३७ हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.याबाबत माहिती अशी की, १६ जुलै रोजी सायंकाळी पुरवठा व महसूल विभागाला गोपनीय माहिती मिळाली की, चांगले नगर, अंबड येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात बेकायदेशीररित्या धान्याचा साठा करून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्री ७;४५ वाजेच्या सुमारास सदर गोदामावर छापा टाकला.गोदामाच्या दरवाजाला कुलूप असल्याने आणि मालक शेख नसीर अब्बास बागवान (रा. अंबड) यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने, पंचासमक्ष गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
तपासणी दरम्यान गोदामात कोणताही वैध परवाना किंवा नोंद नसलेला खालील मुद्देमाल मिळून आला यामध्ये गहू १८९ गोण्या (एकूण ९४.५० क्विंटल) – किंमत अंदाजे रु.२ लाख ९७ हजार ७०२ तर तांदूळ १५२ गोण्या (एकूण ७६ क्विंटल) – किंमत अंदाजे रु. ३ लाख हजार ७१६ इतर साहित्य मध्ये शासकीय धान्य वितरणासाठी वापरली जाणारी ८० रिकामी पोती आणि ६ हजार ५०० रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण रु. ६ लाख ३७ हजार ४१८ मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास याप्रकरणी तहसील कार्यालय अंबड येथील निरीक्षण अधिकारी किरणकुमार शत्रुघ्न खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नसीर अब्बास बागवान याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा (रजि. नं. 0528/2026) दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (SI) भगवान नरोडे करत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.