प्रशासनाचा ‘कलेक्टर’ पॅटर्न:आशिमा मित्तल यांचा ‘गाव मुक्काम’ दौरा ठरतोय ग्रामीण विकासाचा टर्निंग पॉईंट

सूर्योदय विशेष वृत्त

सामान्यतः वातानुकूलित दालन,फाईल्सचा ढीग आणि प्रोटोकॉलच्या गराड्यात व्यस्त राहणारे जिल्हाधिकारी पाहिलेल्या ग्रामीण जनतेला सध्या जालना जिल्ह्यात एक वेगळाच आणि सुखावह अनुभव मिळत आहे. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ‘टेबल प्रशासना’ला थेट ‘ग्राउंड लेव्हल’वर आणत एक नवा पायंडा पाडला आहे.आतापर्यंत सहसा कोणताही वरिष्ठ अधिकारी गावात रात्रीच्या मुक्कामाला जात नसताना,जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्वतः गावात मुक्काम करून थेट ग्रामस्थांच्या दारात प्रशासन पोहोचवले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या ‘गाव मुक्काम’ दौऱ्यांमुळे केवळ प्रलंबित प्रश्न सुटत नसून, ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेला एक वेगळीच गती आणि शिस्त आली आहे.

‘ऑन द स्पॉट’ निर्णय:महिलांच्या हक्काचा हॉल केला मोकळा

जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे लालफितीत अडकलेले प्रश्न जागेवरच निकाली निघत आहेत. अंबड तालुक्यातील मौजे मार्डी येथे २२ जून रोजी झालेल्या मुक्कामी दौऱ्यात, महिला ग्रामसंघाच्या हॉलवर काही व्यक्तींनी केलेल्या अनधिकृत कब्जाची तक्रार महिलांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याची केवळ दखलच घेतली नाही, तर दुसऱ्याच दिवशी सकाळी स्वतः घटनास्थळी जात तो हॉल रिकामी करून महिलांच्या ताब्यात दिला. कित्येक वर्षांचा प्रलंबित प्रश्न एका रात्रीत सुटल्याने प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमालीचा वाढला आहे.

जलतारा’ आणि ‘सप्तसूत्री’:भविष्यातील पाणीटंचाईवर मात

अंतरवाली सराटी येथील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ शासकीय आढावा घेतला नाही, तर भविष्यातील पाणीटंचाई ओळखून ग्रामस्थांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. भूजल पातळी वाढवण्यासाठी त्यांनी ‘जलतारा’ ही अभिनव संकल्पना मांडली. विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि गावात ‘जलपंचायत’ स्थापन करून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन करण्याचा त्यांनी दिलेला संदेश गावाचा कायापालट करणारा ठरणार आहे.

शेतीला आधुनिकतेची जोड आणि २० वर्षांचा बंद रस्ता खुला

कडवंची येथील द्राक्ष शेतीच्या यशोगाथेचे कौतुक करत असतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता सीड्स,रेशीम शेती आणि ‘जल कवच’ योजनेचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे, मौजे सौंदलगाव खुर्द येथील सुमारे वीस वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता प्रशासकीय समन्वयातून खुला करण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन या रस्त्याची पाहणी केली,ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली.

पहाटेपासून तपासणी:अवैध धंदे आणि यंत्रणेवर जरब

जिल्हाधिकाऱ्यांचा हा दौरा केवळ औपचारिक नसून प्रत्यक्ष कारवाईचा आहे.मार्डी येथे महिलांच्या तक्रारीवरून गावात सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्रीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.तसेच,पहाटे ६ वाजल्यापासून गावातील महा-ई-सेवा केंद्र, रेशन दुकान आणि अंगणवाड्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे.अंगणवाडीत साठा आणि रजिस्टरमध्ये तफावत आढळताच त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले.इतकेच नव्हे,तर अंगणवाडीतील खिचडीची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांनी स्वतः अन्नाची चव घेतली आणि जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना थेट गणित व इंग्रजीचे धडेही शिकवले.

निवडणूक प्रक्रियेची अचूकता (SIR अभियान)

अंतरवाली सराटी येथे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाचा आढावा घेत,जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाची थेट तपासणी केली.एका कुटुंबाचा एन्युमरेशन फॉर्म प्रत्यक्ष भरून घेत क्षेत्रीय स्तरावरील कामाची अचूकता त्यांनी स्वतः पडताळून पाहिली.

लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरू केलेला हा ‘गाव मुक्काम’ दौरा म्हणजे केवळ एक शासकीय उपक्रम नसून,लोकशाहीतील लोकाभिमुख प्रशासनाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे.वरिष्ठ अधिकारी जेव्हा स्वतः गावात मुक्काम करतो, तेव्हा स्थानिक प्रशासकीय यंत्रणा (तसेच तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक) अधिक सतर्क आणि उत्तरदायी बनते.यामुळे फाईल्सचा प्रवास गतिमान झाला असून जनतेच्या तक्रारींचे निवारण थेट जागेवरच होत आहे. आशिमा मित्तल यांनी पाडलेला हा पायंडा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!