टँकर घोटाळ्याचे बिंग फुटताच अंबड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक पी.एन.वाघ पिसाळला?

सूर्योदय’च्या पत्रकाराला अरेतुरे करत दिल्या धमक्या; संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल!

 

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

अंबड तालुक्यात विहिरींना मुबलक पाणी असतानाही केवळ सरकारी निधी हडप करण्यासाठी बोगस पाणीटंचाई दाखवून टँकर मंजूर करण्याचे रॅकेट दैनिक सूर्योदय’ ने उघड केले होते. वरिष्ठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन फेर चौकशी अंती हे बोगस टँकर तडकाफडकी बंद केले.मात्र,हा मलिदा बंद झाल्यामुळे अंबड पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाचे कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पी. एन.वाघ पुरते अडचणीत आले आहेत. आपला गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याच्या रागातून पाणीटंचाई विभागाच्या या जबाबदार कनिष्ठ सहाय्यकाने ‘सूर्योदय’च्या प्रतिनिधीला गाठून अत्यंत उद्धटपणे हुज्जत घातली व शासकीय पदाचा तोरा दाखवत धमकावण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आता समोर आली असून,यामुळे पंचायत समितीमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

“सगळ्या गावांचे टँकर बंद करून तुझ्या घरी पाठवू का?”

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित कनिष्ठ सहाय्यक पी. एन. वाघ याने पत्रकाराला गाठून “तू सारख्या बातम्या का छापु राहिला? तुझी काय दुश्मनी आहे का?” असा दम भरला. जेव्हा प्रतिनिधीने स्पष्ट केले की,”वरिष्ठांनी चौकशी करून टँकर बंद केले आहेत का?,” तेव्हा यंत्रणेचा माज दाखवत वाघ म्हणाला,”जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनाच विचार कोणते टँकर बंद झाले! जास्त माहिती आहे तर तालुक्यातील सर्व टँकर बंद करून तुझ्या घरी पाठवतो!” टँकरच्या फाईल्स हाताळण्याची आणि मंजुरीचे प्रस्ताव पुढे सरकवण्याची जबाबदारी असणाऱ्या एका जबाबदार कनिष्ठ सहाय्यकाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशी गावंढळ आणि अरेरावीची भाषा वापरणे अत्यंत संशयास्पद आणि निंदनीय आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारालाच आव्हान

या कनिष्ठ सहाय्यकाचा उद्दामपणा एवढ्यावरच थांबला नाही,तर तो पत्रकाराला म्हणाला, “कलेक्टर ला बातमी पाठवली म्हणजे तू लगेच मोठा पत्रकार झाला का?” कनिष्ठ सहाय्यक पी.एन.वाघ याच्या या विधानावरून, टँकर लॉबिंग करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मनात जिल्हा प्रशासनाचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काडीचाही वचक राहिलेला नाही,हे स्पष्ट होते. बोगस टँकर बंद झाल्यामुळे कंत्राटदारांचे आणि स्वतःचे आर्थिक गणित कोलमडल्यामुळेच हा कर्मचारी आता पत्रकारांवर रोष काढत आहे.

मुजोर कनिष्ठ सहाय्यक पी.एन.वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई होणार का?

शासकीय निधी लाटण्याचा डाव उधळला गेल्यामुळे पाणीटंचाई विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकाची भाषा आता पूर्णपणे घसरली आहे.पत्रकारांना माहिती देण्याऐवजी,उलट त्यांनाच धमकावणे,जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करणे आणि अरेरावी करणे हा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचा थेट भंग आहे.

या संभाषणाचीऑडिओ क्लिप आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह देण्यात येणार असून निलंबनाची मागणी ही मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांना जर शासकीय कार्यालयातच धमकावले जात असेल, तर मग सर्वसामान्य जनतेचे काय होत असेल? जिल्हा प्रशासनाने आता कनिष्ठ सहाय्यक पी. एन. वाघ याची कुंडली बाहेर काढून त्याला तात्काळ निलंबित करावे,अशी मागणी होत आहे

 

पुढील भाग लवकरच…..

Leave a Comment

error: Content is protected !!