सुखापुरी पोलीस चौकीत कायद्याचा लिलाव; ‘५’ तारखेचा मुहूर्त अन् हप्त्यांचे ‘रेट कार्ड’ चव्हाट्यावर…!
सूर्योदय वृत्तसेवा|जालना
अंबड तालुक्यातील सुखापुरी पोलीस चौकी सध्या एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.दैनिक सूर्योदयच्या हाती लागलेल्या खळबळजनक पुराव्यांनुसार, सुखापुरी पोलीस चौकीत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नाही,तर चक्क अवैध धंद्यांना अभय देण्यासाठी एक विशिष्ट ‘रेट कार्ड’ निश्चित करण्यात आले आहे.या रेट कार्डमध्ये कोणत्या अवैध धंद्यासाठी साहेबांना किती हप्ता द्यावा लागेल,याचा पाढाच वाचण्यात आला असून, खाकी वर्दीचा असा जाहीर लिलाव पाहून परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सुखापुरी पोलीस चौकीत सध्या एका विशिष्ट अधिकाऱ्याचे राज्य सुरू असून,त्याने प्रत्येक गुन्ह्याचा दर ठरवला आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या रेट कार्डचे स्वरूप अत्यंत धक्कादायक आहे. अवैध देशी दारू विक्रीसाठी दोन ते तीन हजार रुपये,तर नियमांचे उल्लंघन करून विकल्या जाणाऱ्या देशी दारूच्या बॉक्स पार्सल विक्रीसाठी महिन्याला सात हजार रुपयांचे ‘अभय कवच’ दर निश्चित करण्यात आले आहेत.इतकेच नव्हे तर गरिबांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध मटका आणि जुगार अड्ड्यांकडून दर आठवड्याला तीन ते चार हजार रुपये उकळले जात असून इतर वाळू किंवा माफियांचे दर साहेबांच्या मर्जीनुसार जागेवरच सेटल केले जातात.
सुखापुरीतील सामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी लोक ‘चोरी वाढली’ आणि ‘कायदा हवा’ अशी मागणी सुखापुरी परिसरातील नागरिकांकडून होताना दिसत आहे.याच चौकीच्या पडद्यामागे ‘मिस्टर ५ तारीख’ची वसुली डायरी आणि हप्त्यांचे गणित जोरात सुरू आहे.पाच तारीख उजाडताच साहेबांची ही डायरी सक्रिय होते आणि अवैध धंदेवाल्यांकडून लक्ष्मी दर्शन घडवले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आता अनिवार्य झाले आहे,कारण सुखापुरी चौकीत चालणारा हा हप्ता वसुलीचा मुहूर्त आणि रेट कार्डची ही पद्धत संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी आहे.सामान्य माणसाने सुरक्षेची अपेक्षा कोणाकडून करायची असा प्रश्न आता उपस्थित होत असून,दैनिक सूर्योदय या भ्रष्ट व्यवस्थेचा पाठपुरावा करत राहील आणि जोपर्यंत त्या ‘वसुली सम्राटावर’ कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.
पुढील भाग लवकरच…..